Disha Salian Case : दिशा सालियनच्या वकिलांचा मोठा खुलासा; म्हणाले…
दिशा सालियन प्रकरणाचा तपास (Disha Salian Case) मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा वाद पेटला आहे.

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाचा तपास (Disha Salian Case) मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा वाद पेटला आहे. या संवेदनशील प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून दिशा सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी अत्यंत स्फोटक दावे केले आहेत.
एका महिलेवर झालेल्या अत्याचाराचे अनेक ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला. दिशाचे (Disha Salian Case) वडील सतीश सालियन हे केवळ आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत, मात्र या प्रकरणाला जाणीवपूर्वक राजकीय रंग दिला जात असल्याचे ओझा यांनी स्पष्ट केले.
कायदेशीर कारवाईदरम्यान विरोधकांना न्यायालयात हार पत्करावी लागली आणि माफी मागावी लागली, याची आठवण करून देत ओझा यांनी धमक्या देणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. “हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो, कोणाच्याही धमक्यांना आम्ही जुमानणार नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
एवढेच नाही तर राजकीय हेतूने केलेल्या वक्तव्यांप्रकरणी मानहानीची नोटीस बजावली जाईल आणि या तपासात निष्पक्षता आणण्यासाठी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी करण्याशिवाय सीबीआयकडे पर्याय उरलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
दुसऱ्या बाजूला या प्रकरणातील संघर्षाने थेट राजकीय वळण घेतले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनंतर सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात तब्बल ५०० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला असून ही नोटीस बजावण्यासाठी ते ‘मातोश्री’वर जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
या घडामोडींवर (Disha Salian Case) शिवसेना नेते संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे कुटुंबावर आणि पक्षावर जाणीवपूर्वक चिखलफेक केली जात असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, “अब्रू फक्त त्यांनाच असते का, आम्हाला प्रतिष्ठा नाही का? दुसऱ्याच्या हातचे बाहुले बनून हा सर्व खेळ सुरू आहे. हे काही बेवडे आणि उरबडव्यांचे एकत्र आलेले टोळके असून, त्यांना पडद्यामागून नियंत्रित केले जात आहे.” एका बाजूला न्यायाची मागणी आणि सीबीआय कारवाई, तर दुसऱ्या बाजूला ५०० कोटींच्या नोटीसमुळे तापलेले राजकारण यामुळे दिशा सालियन प्रकरण आता कोणत्या टोकाला पोहोचणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






