सांगली -सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात येणाऱ्या संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारसोबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच तिन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींची लवकरच सांगलीत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, “”सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये महापूर आला होता. यावर्षीही महापुराचा धोका आहे.त्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाणीपातळीबाबत कर्नाटक सरकारसोबत चर्चा करण्यात येणार आहे. महापुराची कारणे शोधण्यासाठी शासनाने वडनेरे समिती नियुक्त केली होती. वडनेरे समितीने शासनास अहवाल सादर केला आहे.”वडनेरे समितीने सुचविलेल्या उपाययोजनांबाबत सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच नदीचे पाणी जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्याबाबतदेखील विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पाटील म्हणाले, “”गेल्यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रात एक हजार 800 मिलीमीटर पाउस झाला होता. गेल्यावर्षीसारखी यावर्षी महापुराची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. पूरप्रवण क्षेत्रातील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पूरपरिस्थिती उदभवल्यास काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबाबतीतदेखील उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.” तसेच जिल्ह्यातील नदीकाठच्या तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच प्रात्यक्षिकदेखील करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीस कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, आयुक्त नितिन कापडणीस आदी उपस्थित होते.