अग्रलेख : सलोखा जपा…

अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. लोकशाही आणि राजकारणात हिंसेला थारा नको अशी भूमिका तेथे मांडली गेली. ट्रम्प हल्ला प्रकरणात भारतातही हीच भूमिका घेतली गेली. ट्रम्प बचावले हे त्यांचे सुदैव. हल्ल्याची ही घटना त्यांना जागे करणारी आहेच, मात्र जगभरातील सर्वच लोकशाही देशातील राजकारण्यांनाही सावध करणारी आहे. हिंसाचाराचे जे बीज राजकीय लाभाचे गणित डोळ्यासमोर ठेवून मांडले गेले होते त्यातून कोणाचा किंबहुना आपलाही बळी जाऊ शकतो असा संदेश या घटनेने त्यांना दिला आहे.
राजकारणात विचारांची लढाई असते. ट्रम्प प्रकरणानंतर निषेध व्यक्त करणार्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया विशेषत: भारतातील प्रतिक्रिया आश्चर्य निर्माण करणार्या आहेत. त्याचे कारण आपण दुसर्या देशातील घटनेबाबत चटकन निवाडा करून मोकळो होतो. तथापि, स्वत: मात्र त्याच्या अगदी विरूद्ध वागत असतो. एखाद्याचा विरोध करताना आपण एवढे टोकाला जातो की संपूर्ण वातावरणच विषारी करून टाकतो. भारतात पूर्वी राजकीय विरोधक हे परस्परांचे स्पर्धक असायचे. संसद अथवा अन्य मंचांवर ते खुलेपणाने आणि द्वेषाचा भाव न ठेवता मते मांडायचे आणि विरोधकही अंतर्मुख होऊन स्वत:त बदल करण्याचा प्रयत्न करायचे किंवा टीका सकारात्मकतेने स्वीकारायचे. खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या एका भाषणात त्यांनी अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळात पंडित नेहरूंवर कशी टीका केली होती आणि स्वत: नेहरू यांनी ती टीका केवळ खुल्या दिलाने स्वीकारलीच नाही तर अटलजींचे कौतुकही केले होते याची आठवण सांगितली आहे. किंबहुना अटलजी भविष्यात भारताचे पंतप्रधान होतील असे भाकित अन्य कोणाच्या अगोदर नेहरू यांनी केले होते.
आज कोणावर टीका केली तर लोक नाराज होतात, बोलणे बंद करतात. कोणाचे शत्रुत्व पत्करण्यासारखेच हे झाले आहे अशी खंत अटलजींनी दोन-अडीच दशकांपूर्वी व्यक्त केली होती. दुर्दैवाने त्यानंतर स्थितीत सुधारणा तर झाली नाहीच उलट स्थिती आणखीनच बिघडत चालली आहे. जाहीरपणे परस्परांना अपमानित करणे आणि हीच लोकशाही आहे असे सादर करण्याचा पायंडा पडला आहे. नेते जसे करतात, तेच त्यांचे कार्यकर्ते आणि प्रवक्तेही करताना दिसतात. त्यात सोशल मीडियाची भर पडली आहे. स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणारे असंख्य विद्वान यूट्युब आणि तत्सम माध्यमांतून द्वेष आणि तिरस्कार जास्तीत जास्त कसा सगळीकडे पसरेल याची दक्षता घेतात. त्याहीपुढे ज्यांचा सक्रिय राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नाही, मात्र कोणा नेत्याला अथवा विचारधारेला मानणारे असंख्य सर्वसामान्य लोक खासगी आयुष्यातही त्यांच्यापेक्षा वेगळा विचार असणार्या व्यक्तीशी शत्रुभाव जोपासताना दिसतात. हे दिवसेंदिवस अगदी खोल झिरपत चालले आहे.
संपूर्ण समाज ज्वालाग्राही पदार्थाच्या सान्निध्यात बसला असून केवळ एक ठिणगी पडण्याचा अवकाश तेवढा आहे, असे वातावरण धोकादायक झाले आहे. राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी स्वत:चे मत मांडण्याची समाजमाध्यमे विकसित केली आहेत. संसदेत अथवा राज्यांच्या विधिमंडळात गदारोळामुळे ज्या चर्चा होऊ शकल्या नाहीत त्या मुद्द्यांवर त्यांनी या माध्यमांवर तरी चर्चा करणे अपेक्षित होते. तसे न होता केवळ आपल्या विरोधातील पक्ष किती भ्रष्ट, देशहित विरोधी, अज्ञानी, समाजातील विशिष्ट वर्गांचा शत्रू आहे हे शक्य तितक्या द्वेषपूर्ण भाषेत सांगितले जाते. ज्यांच्यावर आरोप होतात त्यांच्याकडून याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाते. माध्यमांतील हा धुमाकूळ पाहून जो जास्त द्वेष करू शकेल त्याचीच या गुणवत्तेच्या आधारावर निवड करून या ठिकाणी त्याला बसवले आहे का, असा प्रश्न पडतो. द्वेषाच्या या तडाख्यातून कालपरवा खासदार झालेल्या व्यक्तीपासून विरोधी पक्षनेते आणि देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधानही सुटले नाहीत. समाजमाध्यमातील या तिरस्कारावरून आपल्या लोकशाहीचे ओंगळ दर्शनच रोज घडते आहे. निवडणुकांमध्ये जय आणि पराजय होत असतो. ज्याचा पराभव होतो त्याने तो जनादेश म्हणून स्वीकारायचा असतो आणि ज्याचा विजय होतो त्याने व त्याच्या समर्थकांनीही विजय विनम्रपणे स्वीकारायचा असतो. तेथे पराभूत उमेदवारांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्याची आवश्यकता नसते.
राहुल गांधी यांनी त्यांच्या समर्थकांना हेच सांगितले ही जमेची बाजू. स्मृती इराणी यांच्या पराभवानंतर ज्या पद्धतीच्या भाषेचा त्यांच्या विरोधात वापर होत होता त्याला राहुल यांनीच पूर्णविराम देत एक नवा मार्ग दाखवला आहे. कोणाच्याही विरोधात अपमानजनक भाषा न वापरण्याची त्यांनी सूचना केली आहे. सगळ्याच नेत्यांनी त्यांच्या समर्थकांना असे सांगण्याची गरज आहे. राजकारणातील सभ्यतेचे आणखी एक स्तुत्य उदाहरण म्हणून ओडिशातील नवीन पटनायक यांचे देता येईल. अडीच दशके राज्याची एकहाती धुरा सांभाळणार्या या नेत्याने सत्ता गेल्यावर नव्या नेत्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून अत्यंत नम्रतेने शुभेच्छा दिल्या आणि प्रचाराच्या काळातील कटुता क्षणार्धात संपवली.
राजकीय नेत्यांची भाषा, त्यांचे विचार, त्यांचे सार्वजनिक जीवनातील आचरण त्यांच्या कार्यकर्त्यांचेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनाही राजकीय आणि सामाजिक प्रशिक्षण देण्याचे काम करत असतात. नेता ज्या पद्धतीने बोलतो वागतो त्या पद्धतीनेच त्याच्या कार्यकर्त्यांची जडणघडण होत जाते. अधिकार्यांना दमबाजी, कानाखाली आवाज काढण्याची भाषा, लोकशाहीला कोणत्याही परिप्रेक्ष्यातून न शोभणारा शिवराळपणा या सगळ्यांचे उदात्तीकरण न होता तेथे समंजस आणि सुसंस्कृतपणाला स्थान देण्याची गरज आहे. चर्चा, संवाद आणि विरोधकाला शत्रू न मानता स्पर्धक मानत सद्भावनेने केलेले राजकारणच लोकशाही आणि लोकशाहीतील नेत्यांच्या आणि जनतेच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असेल.





