Cabinet Expansion: शिंदेंच्या नाराजीबाबत चर्चांना पुन्हा फुटले तोंड; मंत्रिमंडळ विस्तारासाठी फक्त फडणवीस आणि पवारच गेले दिल्लीला

मुंबई/ नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काहीतरी वेगळ्या घडामोडी घडतात की काय अशी चर्चा राजधानी दिल्ली आणि राज्याची राजधानी मुंबईतही सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे आता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहे. विशेष बाब ही की त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारही दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत, मात्र या बैठकीला एकनाथ शिंदे त्यांच्या समवेत नसल्यामुळे चर्चांना तोंड फुटले.
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत, ज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. या बैठकीला अजित पवारही उपस्थित राहू शकतात असे म्हटले जाते आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कोणते खाते मिळणार याबाबत भाजप हायकमांडच्या बैठकीत निर्णय होणार आहे. शिंदे यांना पीडब्ल्यूडी विभागाची ऑफर दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना का बोलावण्यात आले नाही, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे मत आवश्यक नाही की आणखी काही कारण आहे असा संशय बळावला आहे.
राज्यात जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा सुरू होती, तेव्हापासून एकनाथ शिंदे नाराज दिसत होते. महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजप हायकमांडची भेट घेतली होती. तेथून परतल्यानंतर ते मूळ गावी गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी ते मुख्यमंत्री न झाल्याबद्दल नाराज आहेत. त्यामुळेच शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्तारात बोलावण्यात आले नाही, अशी अटकळ बांधली जात आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की ते स्वतः या बैठकीला आले नाहीत.
अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला जाण्याबाबत राजकीय पंडितांची वेगवेगळी मते आहेत. भविष्यात भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून दुरावेल आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सरकारमध्ये सामील करेल, असे काहींचे म्हणणे आहे, तर काहींच्या मते अजित पवार भाजप हायकमांडसमोर आपली मागणी मांडण्यासाठी गेले आहेत. मात्र, शिंदे या बैठकीला उपस्थित नसल्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.
अजित पवारांचा प्लान बी तयार –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत न आल्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, शिवसेनेला जे हवे आहे ते त्यांना देण्याचा शब्द देण्यात आला आहे. गृह खात्याचा तिढा सुध्दा सुटला आहे. या कारणामुळे शिंदे आले नाही. अजित पवार भेटीसाठी आलेत कारण त्यांना प्लान ‘बी’च्या मुद्यावर चर्चा करायची होती, असे सूत्राचे म्हणणे आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होणे आहे. गृहमंत्री शहा यांच्यासोबतच्या आजच्या भेटीनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी 14 डिसेंबरला होणे जवळपास निश्चित आहे.





