काळ्या रंगावरून भेदभाव; केरळच्या महिला मुख्य सचिवांनी थेट टीका करणाऱ्यांची केली बोलती बंद

Sarada Muraleedharan | केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांनी वर्णभेद तसेच महिला असण्यावरून सामना कराव्या लागलेल्या भेदभावांवर भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवले आहे. यात त्यांनी अनुभवलेल्या काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. सध्या त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय लिहिले ?
“माझ्या मुख्य सचिवपदाच्या कार्यकाळाबाबत एक कमेंट मी ऐकली. ‘तुझ्या नवऱ्याची कारकिर्द जितकी गोरी, तितकी तुझी काळी’ अशी ती कमेंट होती. मी ही कमेंट का सांगितली? मला या पोस्टचं वाईट तर नक्कीच वाटलं. पण गेल्या सात महिन्यांत माझ्या पतीशी माझी सातत्याने तुलना केली जात आहे. मला काळ्या रंगाचं लेबल लावलं गेलं (त्यात मी एक महिला आहे ही बाबही होतीच). जणूकाही ही अशी बाब आहे जिची मला लाज वाटायला हवी. काळा म्हणजे फक्त काळा रंग नाही, काळा म्हणजे दुष्ट, काळा म्हणजे निराश, काळा म्हणजे क्रूर असंच समीकरण झालंय”, असं शारदा मुरलीधरन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
“मी चार वर्षांची असताना माझ्या आईला म्हणाले होते की ती मला पुन्हा तिच्या पोटात घेऊन नव्याने गोरी आणि सुंदर बनवू शकेल का? काळा रंग चांगला नसतो, हेच माझ्यावर ठसवलं गेलं. काळ्या रंगात सौंदर्य किंवा मूल्य नसतात याच समजुतीनिशी लहानाची मोठी झाले. गोऱ्या रंगाला महत्त्व देत राहिले. गोरा रंग, गोरं मन असं जे काही गोरं आहे, तेच श्रेष्ठ मानत राहिले. ते मी नाही यासाठी कायम स्वत:ला कमी लेखत आले. पण या सगळ्याची कुठेतरी नुकसानभरपाई व्हायला हवी होती”, अशा शब्दांत शारदा मुरलीधरन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Sarada Muraleedharan |
काळा रंग सुंदर आहे, काळा रंग अप्रतिम
“माझ्या मुलांना त्यांच्या काळ्या रंगात कमीपणा वाटत नाही. जिथे मला सौंदर्य सापडलं नाही, तिथे त्यांना ते सापडलं. काळा रंग सुंदर आहे हा विचार त्यांनी मला समजावला. काळा रंग सुंदर आहे, काळा रंग अप्रतिम आहे ही दृष्टी माझ्या ठायी निर्माण करण्यासाठी त्यांनी मला मदत केली”, असे शारदा मुरलीधरन यांनी म्हटलं आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आज आपण स्वतःला आधुनिक म्हणत असलो तरी समोरच्या व्यक्तीची गुणवत्तेवरून पारख न करता व्यक्तिमत्त्वावरून पारख करण्याची मानसिकता अद्याप बदललेली नाही, हे पुन्हा एकदा मुरलीधरन यांनी आधोरेखित केले आहे.
कोण आहेत शारदा मुरलीधरन ?
शारदा मुरलीधरन या ५९ वर्षीय सनदी अधिकारी केरळच्या मुख्य सचिवपदी कार्यरत आहेत. त्यांचे पती डॉ. व्ही. वेणू हे देखील सनदी अधिकारीच होते. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी ते सेवानिवृत्त झाले. ते देखील केरळचे मुख्य सचिव होते. त्यांच्याकडून ही सूत्र थेट त्यांच्या पत्नी शारदा मुरलीधरन यांच्याकडे आली. Sarada Muraleedharan |
हेही वाचा:
तैवानच्या चार सैनिकांनी केली चीनसाठी हेरगिरी; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा





