Satara | कातरखटावमध्ये वाहनांना लागणार शिस्त

वडूज, {नितीन राऊत} – खटाव तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या कातरखटाव येथे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बेशिस्तीमुळे हैराण झालेल्या वाहनचालकांचा व प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कातरखटाव ग्रामपंचायत व वडूज पोलिस ठाणे यांच्या पुढाकाराने वाहनांना शिस्त लावण्याचे काम व्यापारी वर्गाने हाती घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कातरखटाव खटाव तालुक्याच्या पूर्व भागाची मुख्य बाजारपेठ असून परिसरातील ३० ते ३२ खेडयांतील लोक कोणत्या तरी कारणाने कातरखटावमध्ये येत असतात.
वडूज तालुक्याचे ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्याने या खेडयातील लोकांना वडूजला जाण्यासाठी कातरखटाव गावातूनच प्रवास करावा लागतो. तसेच किरकोळ साहित्य खरेदी करण्यासाठी कातरखटाव येथे यावे लागते.
त्यासाठी लोक दुचाकी व चारचाकी घेऊन येत असतात. तसेच जिल्हृयाची अग्रणी सातारा जिल्हा बॅक ही याच मार्गावर असल्याने बॅकेंच्या कामासाठी येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करीत असतात. किराणा व इतर साहित्य खरेदीसाठी येणारे ग्राहकही याच मार्गावर आपली गाडी पार्क करतात. त्यामुळे पार्किंगची मोठी समस्या निर्माण होते.
परिणामी लांब पल्ल्याच्या गाडया, रुग्णवाहिका, अवजड वाहने यांना या रस्त्यावर लावलेल्या दुचाकी व चारचाकीमुळे एक एक तास ताटकळत बसावे लागते. वाहन चालक, दुकानदार व ग्राहक यांच्यामध्ये सतत वादावादीचे प्रसंग येत आहेत.
हे वादावादीचे प्रसंग टाळण्यासाठी व लांबपल्ल्याच्या गाडयांचा, रुग्णवाहिकेचा वेळ वाचण्यासाठी कातरखटाव ग्रामपंचायत, सर्व व्यापारी व वडूज पोलिस ठाणे यांची संयुक्त बैठक ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यात आली.
बैठकीतील निर्णयांना सर्व व्यापारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत व वडूज पोलिस ठाणे यांनी मान्यता दिली. रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नोटीसा बजावण्यात येणार आहेत. तसेच सम- विषम पार्कींगसाठी आवश्यक पटटे् रस्त्याकडेला ओढण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच नितीन नौगाण यांनी दिली.
यावेळी पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील, माजी सरपंच तानाजी बागल, अजित सिंहासने, दत्ताशेठ बागल, विजय बागल, पोलिस पाटील घनशाम पोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीमध्ये घेतलेले निर्णय
सम विषम पार्कींग सुरु करण्यात यावे,
रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावीत,
रस्त्यावरील दुकानांचे बोर्ड काढण्यात यावेत,
व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी इतरत्र पार्किग सोय करावी
या पार्किंगवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत



