नगर, (प्रतिनिधी) – प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांच्या भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा सोमवार (दि.२६) पासून जिल्हा परिषदे समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
एका प्राथमिक शिक्षिकेने महाराष्ट्र नागरी सेवा लहान मुलांचे प्रतिज्ञापत्र नियम २००५ नुसार २ पेक्षा जास्त अपत्य हयात असल्यास त्यांना शासकीय सेवेतून अपात्र करण्यासंदर्भात पुराव्यासह अर्ज दाखल केला आहे. परंतु प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी आर्थिक तडजोड करुन कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे एका प्राथमिक शिक्षकाने खोटे व बनावट कागदपत्र सादर करून आंतरजिल्हा बदली केली. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. या प्रकरणातही शिक्षणाधिकारी यांनी आर्थिक तडजोड करुन कारवाई केली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.