नगर, (प्रतिनिधी) – नगरमध्ये आढळून आलेल्या पहिल्या करोना बाधित रुग्णाला लवकरच डिस्चार्य मिळू शकतो. कारण या रुग्णाचे पहिले तीन अहवाल निगेटिव्ह आले असून अंतिम 24 तासांचा अहवाल (उद्या) शुक्रवारी मिळणे अपेक्षित आहे. या रुग्णाची प्रकृती पाहता हा अहवालही निगेटिव्ह येईल, त्यामुळे त्याला डिस्चार्य देण्यात येईल, ही नगरकरांसाठी दिलासदायक बातमी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिली.
नगरमध्ये करानाबाधित तीन रुग्ण आढळून आहेत. या रुग्णांना बुथ हॉस्पीटल येथे डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. या तिन्ही रुग्णांची महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त सुनील पवार आणि आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर बोरगे यांनी ही महिती दिली. बोरगे म्हणाले, नगरमधील तिन्ही करोनाबाधित रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. पहिल्या रुग्णांची 7 आणि पुन्हा 14 दिवसांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. 14 दिवसांनंतर अंतिम चाचणी 24 तासानंतर करणे आवश्यक आहे. त्यानुसार पहिल्या रुग्णाच्या स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल उद्या शुक्रवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
हा अहवाल निगेटिव्ह आल्यास पहिल्या रुग्णाला घरी सोडण्यात येईल, असे बोरगे यांनी सांगितले. अन्य दोन रुग्णही ठणठणीत अन्य दोन रुग्णांची प्रकृती देखील ठणठणीत आहे. तिसऱ्या रुग्णाच्या संपर्कात कोण कोण आले? याचे सर्वेक्षण महापलिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 23 जणांच्या स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल कसा येतो, त्यानुसार पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे डॉ. बोरगे यांनी सांगितले.