धोम धरणातून 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग

कवठे – गेल्या दोन दिवसांपासून वाई तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम धरण 99 टक्के तर या धरणाच्या वरच्या बाजूस असलेले बलकवडी धरण 98 टक्के भरले आहे. या दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धोम धरणाच्या विद्युतगृहातून कृष्णा नदीत बुधवारी सायंकाळी 7 वाजता 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
बलकवडी धरणातूनही कोणत्याही क्षणी विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे वाई शहर व कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार रणजित सावंत यांनी दिला आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी कपडे, जनावरे धुण्यासाठी वा अन्य कारणास्तव नदीपात्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. वाई तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
गेल्या 24 तासांत धोम धरण परिसरात 32 व बलकवडी धरण परिसरात 23 मिमी पावसाची नोंद झाली. धोम धरणानंतर बलकवडी धरणातून कृष्णा नदीत कोणत्याही क्षणी विसर्ग करण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्याने तहसीलदार रणजित भोसले परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये फलक लावून याबाबत सूचना देण्याचा आदेश त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दि. 17 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन भोसले यांनी केले आहे. तालुक्यात मंडलनिहाय आज झालेला पाऊस व कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस – धोम 7 (937), पसरणी 7 (1044), पाचवड 7 (1061), भुईंज 8 (915), ओझर्डे 2 (933), सुरूर 2 (893) मिमी.





