आळंदी – श्रीक्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रा सोहळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष (नियंत्रण) स्थापन करण्यात येणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच भाविकांची सुरक्षितता विचारात घेऊन आळंदी यात्रेच्या ठिकाणी पथारीवाले विक्रेते, खेळणी विक्रेते याबाबतचे नियोजन करणे, दर्शन बारीबाबत योग्य नियोजन करणार असल्याचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी सांगितले.
आळंदी येथील नगरपरिषदेच्या सभागृहात बुधवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी कट्यारे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी येथील कार्तिकी एकादशी यात्रा सोहळ्याची पूर्व तयारी बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रशांत बेडम, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त योगी निरंजननाथ, नेहा जोशी, अलका काळे, डि. डि. भोसले, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, राहुल चव्हाण, इंदिरा पारखे, ज्ञानेश्वर वीर, मच्छिंद्र शेंडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या दि. 5 ते 12 डिसेंबरपर्यंत कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या यात्रा सोहळ्यात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी दिल्या आहेत. पोलीस बंदोबस्त तैनात करणे, आळंदी येथे येणाऱ्या वाहनांचे नियोजन करणे, स्पीकरचा आवाज मार्यादीत ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी. ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिकासह सुसज्ज डॉक्टर, औषधे, ओपीडी, आयपीडीची तात्काळ व्यवस्था करावी. अतिरिक्त अग्निशामक बंब याची सोय करावी.
यात्रा काळात पोलीस प्रशासन आळंदी नगरपरिषद प्रशासन व इतर शासकीय खाती यांचे अधिकाऱ्यांनी स्थानिक पत्रकारांचे फोन उचलावेत कारण भाविकांच्या अनेक अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी पत्रकारांशी भाविक संपर्क साधतात मात्र अशावेळी अधिकारी मात्र पत्रकारांचे फोन घेत नाहीत यामुळे ऐन यात्रा काळात भाविकांची कुचंबणा तर होतेच शिवाय पत्रकारार्चा देखील अपमान होतो तरी असे होता कामा नये, अशी मागणी पत्रकार संघाकडून केली गेली.
त्या-त्या विभागांना दिलेल्या सूचना
- आळंदी कार्यक्षेत्रातील अतिक्रमण काढावे.
- प्रमुख भागामध्ये (प्रदक्षिणा रोड, गोपाळपुरा, इंद्रायणी घाट) येथे विद्युत व्यवस्था करावी.
- तात्पुरती शौचालये उभारणे
- यात्रा कालावधीत मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा
- आरोग्याच्या दृष्टीने यात्रेच्या ठिकाणी औषधांची धुर फवारणी करावी
- आळंदी येथील रस्ते दुरुस्त करणे
- आळंदी येथील नियंत्रण कक्षात तसेच शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
- बैठकीतील सूचना
- एस. टी. महामंडळाने शासकीय विश्रामगृहाजवळ तात्पुरते बसस्थानक उभारावे
- देहुफाटा चौकाच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था करावी
- यात्रा कालावधीत जादा बसेसची व्यवस्था करावी
- प्रादेशिक परिवहन विभागाने जड वाहने प्रवेशास प्रतिबंध करावा
- जलसंपदा विभागाने इंद्रायणी नदीत दोन दिवस आधी पाणी सोडावे
- विद्युत विभागाने यात्रा कालावधीत अखंडीत वीजपुरवठा करावा
- सार्वजनिक बांधकाम विभागाने आळंदीकडे येणारे रस्ते व्यवस्थित करावे.