सरकारमध्ये नाराजीनाट्य सुरू : ‘हा’ आमदार देणार आज राजीनामा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सरकारच्या नाराज मंत्र्यांनी सुर आवळण्यास सुरूवात केली आहे. त्याची सुरूवात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झाली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिमंडळा विस्तारात डावलल्यामुळे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रकाश सोळंके हे आज दुपारी 12 वाजाता आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. यासाठी सोळंके पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोळंके यांनी राजीनाम्याची कल्पना पक्षाध्यक्ष शरद पवारांना दिली आहे. मात्र ते पवारांची भेट घेणार नाहीत असे सुत्रांकडून समजते. मराठवाड्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने राजेश टोपे आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लावली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणूकीत प्रकाश सोळंके यांनी भाजपाच्या रमेश आडसकर यांचा पराभव केला होता. प्रकाश सोळंके हे चौथ्यांदा माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तरिही त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने सोळंके नाराज आहेत. माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण विस्तारात डावलले गेल्याने सोळंके नाराज झाल्याचे समजते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा देण्यासाठी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांची वेळ मागून घेतली आहे.
दरम्यान, राजकारणात कोणी वाली उरला नाही. आपण आता निरुपयोगी झालो आहोत, अशी भावना निर्माण झाली आहे. माझा कोणावर राग नाही. त्यामुळे आता या राजकारणाला वैतागलो असून उद्या विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देण्यासाठी वेळ मागितली आहे, असे प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.





