सातारा (प्रतिनिधी) – कराडमधील करोनाबाधित युवक पूर्णपणे बर झाला आहे. त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्याने तो करोनामुक्त झाला असून त्याला घरी सोडण्यात येणार आहे. हा युवक कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील विलगीकरण कक्षात दाखल होता. या युवकाचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे, असे पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.
मुंबईवरून प्रवास करून आलेल्या या युवकावर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये करोनाबाधित (कोविड १९) म्हणून उपचार सुरु होते. त्याची १४ व १५ दिवसानंतर पुन्हा टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये हा करोनाबाधित रुग्ण निगेटिव्ह आला आहे. हा करोनाबाधित युवक पूर्णपणे बरा झाला असून त्याला आज घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आत्तापर्यंत करोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण ११ होती. यापूर्वी एका महिला रुग्णाचा अहवाल १४ आणि १५ दिवसानंतर निगेटिव्ह आला होता. त्या महिला रुग्ण पूर्णपणे बऱ्या झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. तसेच २ रुग्णांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात आता एकूण सात करोनाबाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.