विरोधानंतर झाला होता मार्ग खुला…
पुणे – महापालिकेच्या सिमेंट रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील “आयुका’ गेट बंद झाले आहे. औंध रस्त्यावर आयुका गेटजवळ पालिकेचे सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, या रस्त्यावर ऐन प्रवेशद्वाराजवळ अर्धवट कामामुळे खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे चारचाकी-दुचाकी चालकांना औंध मार्गातून आयुका गेटद्वारे विद्यापीठात जाणे बंद झाले आहे. किरकोळ रस्त्याच्या कामामुळे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गैरसाय होत आहे.
विद्यापीठातील आयुका गेट फक्त विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारीपासून खुले करण्यात आले. मात्र, रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे गेल्या महिनाभरापासून या गेटद्वारे ये-जा करणे बंद झाले आहे. विद्यापीठातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी औंध व पिंपरी परिसरात राहतात. त्यांना आयुका गेटद्वारे जाणे सोयीचे आहे. मात्र, रस्त्याच्या किरकोळ कामामुळे गेटद्वारे जाणे बंद झाल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, आयुका गेटजवळ तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण केल्यास रस्ता खुला होऊ शकतो. अथवा निर्माण झालेला खड्डा बुजविला तरी वाहनांची ये-जा होऊ शकते. किरकोळ रस्त्याच्या कामामुळे औंध मार्गाद्वारे आयुका गेटमधून वाहतूक होत नाही, त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी आहे. गेटजवळील रस्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांतून होत आहे.
औंध, पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी, तिकडून शहरात येण्यासाठी आयुका गेटमधून वाहनचालकांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये वाहतुकीमध्ये वर्दळ वाढली होती. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत होता. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच वाहतुकीसाठी आयुका गेट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याला विरोध होऊ लागल्याने विद्यापीठाने अखेर विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनाच आयुका गेट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रस्त्याच्या कामामुळे आयुका गेटद्वारे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.