Pune : दिव्यांग विद्यार्थ्यांनी केला ‘जल्लोष’

पुणे : दिव्यांग विद्यार्थ्यांत कमालीची गुणवत्ता असते. त्यांना योग्य व्यासपीठ, संधी आणि प्रोत्साहन दिले, तर हे विद्यार्थी कौतुकास्पद कामगिरी करतात. सूर्यदत्त परिवारातील विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीचा स्नेहबंध निर्माण व्हावा, त्यांच्या मनात सामाजिक भावना व संवेदनशीलता रुजावी, यासाठी ‘जल्लोष’सारखे कार्यक्रम उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे दिव्यांग मुलांसाठी ‘जल्लोष २०२४’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. चोरडिया बोलत होते. याप्रसंगी बालकल्याण संस्थेचे क्रीडा शिक्षक अशोक नांगरे, ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला ओक, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके, ‘सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन पुरस्कार’च्या मानकरी प्रियंका दबडे आदी उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात गाणी, नृत्याविष्कार, जादूचे प्रयोग, फुग्यांची उधळण आणि भरपूर खाऊ खात विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहात सहभागी करून घेत त्यांचे जीवन अधिक सहज व सोपे करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे चोरडिया यांनी या वेळी स्पष्ट केले. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग बांधवांना स्वतः बनवलेले कागदी पंखे देऊन स्वागत केले. या कार्यक्रमात विविध १८ संस्थांचे ६०० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.





