Satara: अभिनेत्रीवर अत्याचार प्रकरणी दिग्दर्शक शकील नुरानी ताब्यात
Satara नुरानी हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.

Satara: अभिनेत्रीवरील अत्याचारप्रकरणी मुंबईत गुन्हा दाकल असलेल्या चित्रपट दिग्दर्शक व निर्माते शकील नुरानी याला रेंगडी (ता. जावळी) येथून मेढा पोलिसांनी ताब्यात घेतले. अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जिल्ह्यातील रेंगडी येथे फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता. मेढा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या सुपूर्द केले.
नुरानी हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. मुंबई येथील मालवणी पोलिस ठाण्यात ३३ वर्षीय अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर त्याच्यावर अत्याचार व लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. आगामी चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने नुरानी याने अभिनेत्रीला घरी बोलावून घेतले. तिला नशेचे पदार्थ देणे तसेच चित्रिकरणाच्या माध्यमातून धमकावल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. मालवणी पोलिस नुरानीचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना सापडत नव्हता.
मालवणी पोलिसांना तो सातारा जिल्ह्यातील रेंगडी गावात लपल्याचे समजताच मुंबई पोलिसांनी तातडीने मेढा पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस धीरजकुमार बेचके व शिवाजी डफळे यांनी नुरानी याच्या शेतघरावर सायंकाळी छापा टाकत त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक मेढा पोलिस ठाण्यात पोहोचून त्यांनी त्याचा ताबा घेतला.





