Priyanka Chopra : …म्हणून प्रियंका चोप्रा बॉलिवूडला ठोकणार होती रामराम, दिग्दर्शकाने केला खुलासा

Anil sharma on Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्राने एकापेक्षा एक सुपरहिट हिंदी चित्रपट दिले आहेत. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील तिने आपल्या कामाद्वारे एकवेळी छाप पाडली आहे. मात्र, एकवेळ अशी आली होती, जेव्हा प्रियंका बॉलिवूडला रामराम ठोकून परत घरी परतणार होती. याबाबत प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी खुलासा केला आहे.
‘गदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्रा करिअरच्या सुरुवातीला मुंबईसोडून गावी बरेलीला परतणार होती असा खुलासा केला आहे. अनिल शर्मा यांनी सांगितले की, प्रियंकाच्या नाकाचे चुकीचे ऑपरेशन झाले होते. यामुळे तिच्या हातातून अनेक प्रोजेक्ट गेले. त्यामुळे ती मुंबई सोडून बरेली परतणार होती.
प्रियंकाच्या करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्री ज्यूलिया रॉबर्ट्स सारखे दिसण्यासाठी नाकाचे ऑपरेशन केल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, शर्मा यांनी सांगितले की, हे एक मेडिकल ऑपरेशन होते, जे चुकीचे झाले. यात तिची कोणतीही चुक नव्हती. त्यावेळी चित्रपटासाठी तिला 5 लाख रुपये टोकन देखील दिले होते. ती ही रक्कम परत देण्यासाठी आली होती. मात्र, मी तिला हे पैसे तिच्याकडेच ठेवायला सांगितले व ओरडलो देखील.
अनेक प्रोजेक्ट हातातून गेल्याने प्रियंका मुंबई सोडणार होती. मात्र, यावेळी अनिल शर्मा यांनी तिची साथ दिली. अनिल यांनी पुढे सांगितले की, प्रियंकासाठी वायआरएफमध्ये काम करणाऱ्या एका प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टला फोन केला आणि तिचे नाक दुरुस्त करण्यासाठी मदत करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी नीता लुल्ला यांच्यासोबत कॉस्टिमवर काम केले व तिची स्क्रीन टेस्ट देखील घेतली. विशेष म्हणजे ही स्क्रीन टेस्ट सर्वांना आवडली देखील.
दरम्यान, प्रियंकाने ‘थमिजान’ या तमिळ चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली होती. तर अनिल शर्मा यांच्या ‘द हीरो- लव स्टोरी ऑफ ए स्पाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात सनी देओल, प्रीती झिंटा आणि अमरीश पुरी यांचीही प्रमूख भूमिका होती.





