Dipak Kate : प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे आहे तरी कोण?

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाई फेकून हल्ला करणाऱ्या शिवधर्म फाउंडेशनच्या दीपक काटे याच्यासह 7 जणांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ल्यात गायकवाड यांना दुखापत झाली नसली तरी हल्लेखोरांनी धक्काबुक्की, मारहाण आणि गाडीचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून डीएनएएस 2023 च्या कलम 115(2), 189(2), 191(2), 190, 324(4) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिस कारवाई
अक्कलकोट येथे एका कार्यक्रमासाठी गेले असताना प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकून हल्ला केला. यावेळी काही तरुणांनी असभ्य वर्तन केले. पोलिसांनी दीपक काटे, किरण साळुंखे, भैया ढाणे, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबू बिहारी आणि भवानेश्वर शिरगिरे यांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे दीपक काटे?
दीपक सिताराम काटे हा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक आणि भारतीय जनता पक्षाचा (भाजपा) पदाधिकारी आहे. तो भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. यापूर्वी काटे यांनी संभाजी बिडीच्या नावाविरोधात पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलन केले होते, ज्यामुळे बिडीचे नाव बदलले गेले. तसेच, 2021 मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इंदापूर येथील उद्योजक अशोक जिंदाल यांना काळे फासले होते. दूध दराच्या प्रश्नावरही काटे यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलने केली आहेत.
2022 मध्ये काटे यांनी बारामती येथे भाजपात प्रवेश केला आणि 2023 मध्ये इंदापूर तालुक्यात भाजपाच्या 52 शाखांचे उद्घाटन केले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील आणि गोपीचंद पडळकर उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून शिवधर्म फाउंडेशन संभाजी ब्रिगेडच्या नावाला विरोध करत असून, छत्रपती संभाजी महाराजांचा एकरी उल्लेख टाळण्यासाठी नाव बदलण्याची मागणी करत आहे.
काटे यांचा गुन्हेगारी इतिहास
दीपक काटे यांच्यावर यापूर्वी गंभीर आरोप झाले आहेत. भावाच्या खुनाच्या प्रकरणात त्यांना 8 वर्षे येरवडा तुरुंगात काढावी लागली. तसेच, पुणे विमानतळावरून हैदराबादला जाताना त्यांच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसे सापडल्याने त्यांना अटक झाली होती.





