यवतमाळ – यवतमाळ येथील वणी तालुक्यातील बोर्डा जवळ विरकुंड परिसरात डायनोसॉरचे जीवाष्म सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक प्राचार्य सुरेश चोपणे यांना सुमारे 6 कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसॉर या प्राण्याचे जीवाष्म सापडले आहे. दोन वर्षांपूर्वी डायनोसॉरच्या पायाचे एक अष्मीभूत हाड त्यांना सापडले. यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसॉर जीवाष्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे.
सुरेश चोपणे हे यवतमाळ जिल्ह्यात 20 वर्षांपासून सर्वेक्षण करीत आहेत. यापूर्वी त्यांना पांढरकवडा, राळेगाव, झरी तालुक्यात 6 कोटी वर्षापूर्वीच्या शंख-शिपल्याची जिवाष्मे आढळली होती. यासोबतच त्यांनी 150 कोटी वर्षं पूर्वीची स्ट्रोमॅटोलाईटची जिवाष्मे शोधली आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात 25 हजार वर्ष पूर्वीची पाषाणयुगीण अवजारे सुद्धा शोधली असून हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तीगत शैक्षणिक संग्रहालयात सामान्य नागरिक आणि संशोधकांसाठी प्रदर्शित करून ठेवली आहेत.
वणी तालुक्यातील बोर्डा-विरकुंड परिसरात निओप्रोटेरोझोईक या 150 कोटी वर्षे दरम्यानच्या काळातील पैनगंगा गृपचा चुनखडक असून त्या काळात येथे समुद्र होता. ज्युरासिक काळात येथे विशालकाय अशा डायनोसॉर प्राण्यांचा विकास झाला. पण 6 कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळात प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनोसॉर मारले गेले. बेसाल्ट या अग्निजन्य खडकाच्या रुपाने ते पुरावे आजही ते पाहायला मिळतात. पण अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे जीवाश्मात रूपांतर झाल्यामुळे आज ते सापडत आहेत.
भूशास्त्र विभागातर्फे संशोधन करण्याची मागणी
चंद्रपूरप्रमाणे वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामनी, मुकुडबन हा परिसर जिवाष्मांच्या आणि प्रागैतिहासिक बाबतीत समृध्द आहे. या परिसरात अजूनही जमिनीत किंवा जंगलात डायनोसॉरची जिवाष्मे आढळू शकतात. यासाठी भूशास्त्र विभागातर्फे सविस्तर सर्वे आणि संशोधन होणे गरजेचे आहे असे मत संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.