पुणे – राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे हे नियत वयोमानानुसार शुक्रवारी (दि.31) सेवानिवृत्त झाले आहेत. म्हमाणे यांनी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालये यांच्याबाबतीत शाळा मान्यता, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव, शालार्थ आयडी यासह इतर अनेक प्रकारचे विषय मार्गी लावण्याला सतत प्राधान्य दिले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रश्नही त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हमाणे यांच्या सेवानिवृत्तीची तारीख समजल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून कार्यालयातील प्रलंबित विषय मार्गी लावून घेण्यासाठी शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थांचे व संघटनांचे पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. गेल्या महिन्यात म्हमाणे काही अडचणीमुळे रजेवर गेले होते. यामुळे बहुसंख्य फायलींवर सह्या होणे बाकी होते. अखेर फायलींवर सह्या घेण्यासाठी स्पर्धा लागली होती. साहेब माझ्या फायलीवर सह्या करा, अशी विनंती प्रत्येकांकडून करण्यात येत होती. त्यावर म्हमाणे यांनीही थांबा बाहेर, फायलींवर सह्या होतील असे प्रत्येकांना सांगितले. गर्दीमुळे शेवटच्या दिवशीही म्हमाणे यांची डोकेदुखी वाढली होती.
म्हमाणे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे शिक्षण संचालकांचे पद रिक्तच झाले आहे. या पदावर सेवा ज्येष्ठतेने अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाचे संचालक दिनकर टेमकर यांनाच नियमित नियुक्ती मिळणे आवश्यक होते. दरम्यान शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव र.प्र. आटे यांनी पुढील आदेश होईपर्यंत अथवा नियमित स्वरुपात शिक्षण संचालक रुजू होईपर्यंत दिनकर पाटील यांच्याकडे शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात यावा, अशा आदेशाचे पत्र शिक्षण आयुक्तांना पाठविले.
शासनाच्या आदेशानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पाटील यांना मूळ विभागाचा कार्यभार सांभाळून शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ धारण करण्याचे आदेशही जारी केले आहेत.