दीनानाथ प्रकरणः डॉ. घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे – दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त भाजप महिला पदाधिकार्यांनी डॉ. घैसास यांच्या कर्वेनगरमधील खासगी आश्विनी हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली. यावेळी महिलांनी डॉ. घैसास यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी सकाळपासूनच विविध संघटनांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन करून निषेध केला. संबंधीत महिला ही डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडे तपासणीसाठी गेली होती. डॉ. घैसास हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्या वडीलांचे कर्वेनगर भागात आश्विनी हॉस्पिटल नावाने खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयाची भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
डॉ. घैसास यांच्याविरोधात घोषणाबाजी करून रुग्णालयाबाहेरील कुंड्या फेकून निषेध केला. दरम्यान, सुश्रुत घैसास यांचा या रुग्णालयाशी काही संबंध नाही, असा दावा डॉ. घैसास यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला.
…महिलांवर गुन्हा दाखल –
खासगी रुग्णालयात शिरून तोडफोड केल्याप्रकरणी महिला आंदोलकांवर अलंकार पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. हिंसा प्रतिबंध आणि महाराष्ट्र मेडीकेअर सर्व्हिस पर्सन अॅण्ड मेडीकेअर सर्व्हिस संस्था कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

