Dimbhe Dam – हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यातून जलसंपदा विभागाने गुरुवार, दि.१४ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घोड शाखा कालव्यात पाणी सोडल्यात आले आहे. तब्बल २५ दिवसांचे आवर्तन मंजूर करण्यात आल्याने आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील दहा गावांसह अनेक वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे कळंब गावचा काही भाग, लौकी, थोरांदळे, भराडी, जाधववाडी, नागापूर तसेच जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी परिसरातील छोटे-मोठे बंधारे कोरडे पडण्याच्या स्थितीत आले होते. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याने पिके करपून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांवरही त्याचा परिणाम जाणवत होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रा.दत्तात्रय भालेराव आणि लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी करून कालव्याला तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष देवदत्त निकम यांनीही कुकडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. डिंभे धरण दरम्यान, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच कुकडी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी कालव्यात पाणी दाखल झाले. कालवा सल्लागार समितीचे सदस्य व भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले की, या आवर्तनामुळे परिसरातील दहा गावे आणि वाड्यावस्त्यांवरील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार असून शेतीसाठीही दिलासा मिळणार आहे. दरम्यान, “गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने पाणी सोडले नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी नऊ वाजता कालव्याचे गेट तोडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पाणी सोडले,” अशी माहिती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष देवदत्त निकम आणि युवक अध्यक्ष विशाल वाबळे, भीमाशंकरचे माजी संचालक किसन उंडे यांनी दिली.