पुणे जिल्हा | डिंभे धरण आंबेगावच्या अस्मितेचे प्रतीक

मंचर, (प्रतिनिधी) – हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणामुळे आपल्याला बाराही महिने पाणी उपलब्ध होते. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांनी केलेल्या त्यागामुळे धरणाची निर्मिती झाली असून धरण आपल्या अस्मितेचे प्रतीक असल्याचे मत पूर्वा दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
आंबेगाव तालुक्याचे पश्चिम पट्यात सुरु असलेल्या पाऊसामुळे धरण 100 टक्के भरले असून धरणाचे पाणी पूजन पूर्वा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे,
भीमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव इंदोरे, माजी सभापती संजय गवारी, प्रकाशराव घोलप, शरद बँकेचे संचालक प्रदीप अमोडकर, निलेश थोरात, अंकित जाधव, सोमनाथ काळे, वैभव उंडे, सुषमाताई शिंदे, वैशाली बेंडे ,माणिक संतोष गावडे,अक्षदा शिंदे, ज्योती निघोट,जनाबाई उगले, इंदुबाई लोहकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या की , डिंभे धरण आपल्या तालुक्यासाठी वरदान असून नदीला आपण आई मानतो. नदीच्या काठीगाव वस्ती स्थिरावतात, तयार होतात. नदीमुळे आपल्या अनेक गरजा पूर्ण होतात.
आदिवासी बांधवांच्या त्यागामुळे त्यांच्या जमिनी धरणाला मिळाल्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाची निर्मिती झाली आहे. डिंभे धरणाचे पाणी आंबेगाव पासून सोलापूरपर्यंत जाते. धरणाच्या पाण्यामुळे आपल्याला विविध पिके घेता येतात.
त्या माध्यमातून शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे. त्यामुळे धरण हे आपल्या अस्मितेचे प्रतिक असून त्याच्या पाण्याचे पूजन करणे हे आपले कर्तव्य आहे. यावेळी जलसंपदा विभागाचे उपअभियंता दत्ता कोकणे यांनी पूर्वा वळसे पाटील यांचा सन्मान केला.





