मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान एका बैठकीच्या निमित्ताने शरद पवार यांच्याशी भेट झाल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वार्षिक विश्वस्त मंडळाच्या बैठकीदरम्यान ही भेट झाली. ट्रम्पेटचा फायदा मलाही झाला; वळसे पाटलांनी केले कबुल अजित पवार यांच्या बऱ्याच उमेदवारांना तुतारीशी साधर्म्य असणाऱ्या ‘ट्रम्पेट’ चिन्हाचा फायदा झाला, याकडे लक्ष वेधले असता, दिलीप वळसे पाटील यांनी ‘मलाही ट्रम्पेटचा फायदा झाला’, अशी जाहीर कबुली दिली आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भेटीनंतर दिली ‘हि’ प्रतिक्रिया शरद पवार यांच्या पाया पडलो, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांनी आंबेगावात येऊन केलेली टीका मी कधीच विसरलो, असे आवर्जून सांगत बाकी कोणत्या गोष्टींवर चर्चा केली ते सांगणे उचित नाही, असे दिलीप वळसे पाटील भेटीनंतर म्हणाले. शरद पवार-अजित पवार एकत्र येतील? यावेळी त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील असे विचारले असता त्यासंदर्भात सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यावर बोलणं उचित ठरणार नाही, असे म्हणाले.