नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) आणि माजी महिला क्रिकेटपटू शुभांगी कुलकर्णी (Shubhangi Kulkarni) यांची शनिवारी बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेवर भारतीय क्रिकेटर्स असोसिएशन (आयसीए)चे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
शुभांगी कुलकर्णी यांची बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेवर महिला आयसीए प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड झाली, तर वेंगसरकर यांनी आयसीए अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा यांचा पराभव केला. तीन दिवस चाललेल्या ई-मतदानात वेंगसरकर यांना मल्होत्रा यांच्या 230च्या तुलनेत 402 मते मिळाली.
दरम्यान, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी हे बीसीसीआयमधील पहिले आयसीए प्रतिनिधी होते. ज्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2019 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत होता. लोढा सुधारणांमुळे आयसीए प्रतिनिधींचा बीसीसीआय सर्वोच्च परिषदेत समावेश करण्यात आला.