मुंबई – “माझ्या अनुभवाएवढे त्यांचे वय नाही, रोहित पवारांमुळे शरद पवार यांची साथ सोडली,’ असे म्हणत नवनिर्वाचित मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. सध्या पवार विरुद्ध पवार असा राज्यात संघर्ष सुरु असताना अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आपल्या खदखद व्यक्त करताना दिसत आहेत. यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील शरद पवार यांच्यावर भाष्य केलं होत. वळसे-पाटील पुढे म्हणाले, रोहित पवारांचे वय 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचे वयही लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवे. हा निर्णय घेतला असला तरी आपण कोणीही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच आम्ही काम करणार आहोत, मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही. “मंत्रिमंडळात मी असताना, डिंबा धरणाचं पाणी बोगदा करून नगर तालुक्यात न्यायचे असा प्रस्ताव मांडला होता. आमचे सरकार गेलं आणि या सरकारने धरणातून बोगदा काढायचा निर्णय घेतला. आता जुन्नर आणि आंबेगावमध्ये ऊस शेती आहे आणि जर ऊसाला पाणी मिळाले नाही तर त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येईल. मी हयात भर आमदार राहील किंवा मंत्री राहील हे नक्की नाही. मात्र असे निर्णय झाले तर येथील परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. निर्णय करून घेताना मोठी ताकत सोबत असावी लागते, असेही वळसे पाटील यावेळी म्हणाले.