“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार…” सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे.अशात राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने सोळा आमदार अपात्र होऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
सत्तासंघर्षांवर नेमकं काय निकाल लागणार याकडे संपूर्ण देश लक्ष ठेऊन आहे.न्यायालयाने देखील हा निकाल ऑनलाईन पद्धतीने सर्वांना पाहता येण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक निकाल सर्वांना पाहता येणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे. एका मराठी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. “सत्ता संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदार अपात्र होऊन बाजूला जातील. राहिलेल्यांना भाजपसोबत मंत्रीपदाची संधी मिळून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील” असं खळबळजनक विधान मोहिते पाटील यांनी केलं आहे.
आजच्या सत्ता संघर्षाच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आजच्या निकालावर राज्यातील अनेक पक्षांचं पुढील राजकारण ठरणार आहे. त्यामुळे निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार की ठाकरे गटाच्या हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





