मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदार म्हणजे एफआयआय भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत असताना देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी म्हणजे डीआयआयनी 2025 मध्ये आत्तापर्यंत तब्बल 81.3 अब्ज डॉलरच्या शेअरची खरेदी केली आहे. याच कालावधीत एफआयआयनी मात्र 16.2 अब्ज डॉलरच्या शेअरची विक्री केली असल्याची माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसेस या ब्रोकरेज संस्थेने जारी केली आहे. दुसर्या तिमाहित कंपन्यांच्या ढोबळ नफ्यात 12 टक्के वाढ झाली असली तरी निफ्टी वरील परताव्यात मात्र दोन टक्के वाढ झाली आहे. कारण गेल्या सहा तिमाहीपासून करोत्तर नफा 10 टक्क्यापेक्षा कमी आहे. नोव्हेंबर महिन्यात डीआयआयनी 8.7 अब्ज डॉलरच्या शेअरची खरेदी केली. 28 महिन्यापासून हे गुंतवणूकदार एकतर्फी खरेदी करीत आहेत तर परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक परत घेत आहेत. अमेरिकेच्या आयात शुल्कांमुळे भारताची निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली असली तरी भारत सरकारने केलेल्या उपाययोजनामुळे जीएसटी दरात कपात झाली आहे. अशा परिस्थितीत दुसर्या तिमाहित भारतीय ग्राहकांनी खरेदी वाढविल्यामुळे कंपन्यांच्या उत्पादकतेत वाढ झाली आहे. मात्र आगामी काळातही हे प्रमाण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.