एक व्हिडिओ कॉल येतो. पडद्यावर पोलीस अधिकारी दिसतो आणि काळजात चर्रर्र होतं. ‘‘कॅमेरा बंद न करता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या,’’ असं दरडावून पोलीस अधिकारी प्रश्न विचारू लागतो. नावावर असलेल्या संपत्तीचा तपशील विचारू लागतो. एक वेळ अशी येते की समोरचा निरुत्तर होतो. सामान्यतः हा कॉल समोरची व्यक्ती निरुत्तर होईपर्यंत चालतो. काहींच्या बाबतीत असे कॉल चार-पाच दिवसांपर्यंत चालू राहिलेत. निरुत्तर झालेल्या व्यक्तीला कायद्याची विविध कलमं आणि त्यानुसार असलेली शिक्षेची तरतूद सांगितली जाते. धीर खचलेला माणूस गयावया करू लागतो. मग पोलीस अधिकारी ‘सेटलमेन्ट’च्या गोष्टी करू लागतो. एका विशिष्ट रकमेवर सौदा पक्का होतो. ती रक्कम संबंधिताच्या बँक खात्यातून डेबिट होऊन ‘पोलीस अधिकार्या’च्या खात्यात वर्ग होईपर्यंत कॉल सुरूच राहतो. संभाषण संपल्यानंतर मात्र कॉल ज्या नंबरवरून आला होता, तो अस्तित्वातच राहत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया ‘डिजिटल अरेस्ट’ नावानं ओळखली जाते. वस्तुतः आपल्याच नव्हे तर कोणत्याही देशाच्या कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ची तरतूदच नव्हे तर संकल्पनाही अस्तित्वात नाही. तरीही शेकडो, हजारो लोक या जाळ्यात अडकत चाललेत. साठवलेला बेहिशेबी पैसा असेल किंवा आयुष्यात कधीतरी केलेल्या बेकायदा कृत्यांचं भय असेल, समोरचा तथाकथित पोलीस अधिकारी नेमक्या मुद्द्यापर्यंत पोहोचतोच आणि मग ‘हपापाचा माल गपापा’ या उक्तीप्रमाणं पुढचं सगळं घडतं. कंबोडिया, तैवान, लाओस, व्हिएतनाम, म्यानमार अशा देशांमधून हे फेक कॉल येतात. ज्यांना कायद्याचं भय नाही, अशा व्यक्ती सहीसलामत सुटतात; पण त्यांचा वेळ वाया जातो, शिवाय मनस्ताप होतो. आपण चुकीचं वागलोय अशी शंका असलेल्या व्यक्ती मात्र या ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीनं समोरच्याला ‘प्रसाद’ देऊन स्वतःची सुटका करून घेतात. डॉक्टरांपासून पत्रकारापर्यंत आणि महिलांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत अनेकजण अशा डिजिटल शिकार्यांच्या जाळ्यात अडकलेत. सरकारने अनेकदा इशारे देऊनसुद्धा लोक बळी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर, त्रिसूरमध्ये मात्र विचित्र घटना घडली. मुंबई पोलिसातील अधिकारी असल्याचं सांगून एका स्कॅमरने व्हिडिओ कॉल केला. फोन उचलला गेला; पण कॅमेरा आॅफ होता. पोलीस अधिकार्याच्या वेशातील माणूस बराच वेळ समोरच्याला भीती दाखवत राहिला आणि नंतर समोरच्याने अचानक कॅमेरा ऑन केला. नकली पोलीस अधिकार्याची भंबेरी उडाली, कारण समोर असली पोलीस अधिकारी होता. बिचार्या स्कॅमरने चुकून केरळच्या सायबर सेलचाच नंबर डायल केला होता. त्रिसूर पोलिसांनी या घटनेचा मजेशीर व्हिडिओ मुद्दाम व्हायरल केलाय. समोर खरा पोलीस दिसताच खोट्या पोलिसाची उडालेली त्रेधातिरपीट आणि उतरलेला चेहरा दाखवणं हा त्यामागील एक हेतू आहेच; पण अशा ‘डिजिटल अरेस्ट’ला घाबरू नका, फसू नका हेही पोलिसांना त्यातून सांगायचंय. काही माणसांनी तर अशा प्रकारच्या अटकेनंतर सात-सात दिवस कॅमेरा सुरूच ठेवला, एवढी दहशत या मंडळींनी निर्माण केली आहे. सावध राहणं हा हुकमी मार्ग आहेच; परंतु हा चोर-पोलिसाचा खेळ थांबवणं सरकारी यंत्रणांची जबाबदारी आहे.