याला म्हणतात शेतकरी ! टोमॅटोच्या शेतीसाठी केला डिजिटल AI चा वापर.. एकरी घेतात 3 ते 4 लाखांचे उत्पन्न

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा परिणाम आता शेतीवरही दिसून येत आहे. शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून स्मार्ट शेती करत आहेत. शेतकरी आता कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ( AI ) वापर करत आहेत. टोमॅटोच्या शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी हरियाणामधील कर्नालच्या पधना गावातील शेतकरी प्रदीप कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. कुमार यांनी त्यांच्या शेतात हवामान रिमोट सेन्सिंग सिस्टीम बसवली आहे, ज्याद्वारे त्यांना घरी बसून पिकांवर होणारा किडीचा परिणाम, हवामान, पाण्याची गरज आणि औषधांचा वापर याची संपूर्ण माहिती मिळते. ( Digital farming )
इतकंच नाही तर कुमार यांनी त्यांच्या शेतात येल्लो ट्रॅप मशीन देखील लावले आहेत, ज्याद्वारे कीटकनाशकांचा वापर न करता पीक खराब करणाऱ्या कीटकांचा नायनाट करता येतो. या प्रयोगांमुळे त्यांच्या पिकांची गुणवत्ता वाढली आहे. डिजिटल एआयच्या यंत्रणेमुळे पिकाबाबतचे सर्व रिपोर्ट जलदगतीने आणि समस्येचे निवारण देखील तात्काळ मिळत असल्यामुळे शेती करण सोपं झालं आहे. त्यामुळे नफा वाढला आहे. कीटकनाशकांच्या कमी वापरामुळे पिकांनाही चांगला भाव मिळत आहे. ( AI Farming )
या तंत्रज्ञानाचा फायदा काय ?
प्रदीप कुमार यांनी सांगितले की एका कंपनीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या टोमॅटोच्या शेतात वेदर रिपोर्ट सेन्सिंग सिस्टीम बसवली आहे. त्यामुळे त्यांना घरी बसूनच त्यांच्या पिकाची सर्व माहिती मिळते. कॅमेऱ्याने सुसज्ज असलेल्या या यंत्रणेचे वैशिष्ट्य म्हणजे ते पिकात येणाऱ्या किडींचे छायाचित्र काढून कंपनीच्या कार्यालयात पाठवते. ज्याची तपासणी करून त्याला पिकामध्ये किती औषध वापरायचे आहे हे कळते. एवढेच नाही तर हवामानातील बदल आणि शेतातील पाण्याचा वापर यावरही या प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवता येते. ( Success story of Farmer )
पारंपरिक शेती सोडण्याचे आवाहन
शेतकरी प्रदीप कुमार म्हणाले की, स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यानंतर पीक खर्च कमी झाला आहे. उत्पादनही चांगले होऊ लागले आहे. आज टोमॅटोच्या लागवडीतून एकरी तीन ते चार लाख रुपयांचा नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कुमार यांनी इतर शेतकऱ्यांनाही पारंपरिक शेती बदलून आधुनिक शेती करण्याचा सल्ला दिला आहे.





