Pimpri : ऐन पावसाळ्यात खोदकाम, वाहतूक कोंडीत भर

पिंपरी : ऐन पावसाळ्यात वल्लभनगर येथील एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच खोदकाम सुरू करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल पसरला असून रस्ता निसरडा झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
वल्लभनगर एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारातून दिवसभर एसटी बस येत-जात असतात. तसेच भुयारी मार्गातून आणि नेहरुनगरकडून येणाऱ्या वाहनांची संख्या देखील अधिक असते. यामुळे या परिसरात रोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असते. येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी कधीही वाहतूक पोलीस उपस्थित नसतात.
वाहनचालक स्वत:च रस्ता काढत या कोंडीतून बाहेर पडतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी आता एन पावसाळ्यात खोदकाम सुरू करण्यात आले आहे. यामुळे या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. तसेच खोदकामामुळे निघालेली माती रस्त्यावर पसरुन झालेल्या चिखलाने रस्ताही निसरडा झाला आहे. यामुळे दुचाकीचालकांना येथे दुचाकी घसरु नये, यासाठी कसरत करावी लागते.





