नवी दिल्ली – महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दक्षिण कोरियातील पॉस्को कंपनीचा पोलाद प्रकल्प आहे. मात्र या कंपनीतून पुरेसे पोलाद वेळापत्रकाप्रमाणे उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक वाहन कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वाहन कंपन्यांनी ही माहिती सिआम या कंपन्यांच्या संघटनेकडे दिली आहे. सिआमने म्हटले आहे की, रायगड येथील पोलाद प्रकल्पामध्ये कामगार आणि व्यवस्थापनादरम्यान मतभेद वाढल्यामुळे या प्रकल्पातील उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून वाहन कंपन्यांना होत असलेल्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हा प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष घालून मिटविण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अनेक कंपन्यांचे उत्पादन थांबवावे लागण्याची शक्यता आहे. सिआमचे महासंचालक राजेश मेनन यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अनेक वाहन कंपन्यांनी पोलाद उपलब्ध होत नसल्याची माहिती आम्हाला कळविली आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटार्स, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्या पास्कोच्या प्रकल्पातून पोलाद खरेदी करतात. 4 मार्च पासून रायगड येथील पोलाद प्रकल्पातून पोलाद इतरत्र पाठविलेले नाही. अगोदरच एका कंपनीच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. लवकरच इतर कंपन्यांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अगोदरच वाहन कंपन्या समोर सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच पोलादाच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहन कंपन्यात बऱ्याच प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान वापरले जात आहे. यासाठी सेमीकंडक्टर लागतात. मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये पुरेसे सेमीकंडक्टर वाहन कंपन्यांना उपलब्ध झालेले नाही.