पुणे जिल्हा | आमदार भरणेंची हॅट्ट्रिकची वाट अघवड!

इंदापूर, {नीलकंठ मोहिते} – राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्षांत विभागी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत पुतण्यापेक्षा काका सरसर ठरले आहेत. त्यामुळे अजित पवार गटातील अनेक नाराज मंडळी ही काका म्हणजेच शरद पवारांच्या पक्षात जाण्यास इच्छुक आहेत; मात्र अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव आघाडीवर आहे.
याच भरणेंना यंदा हॅट्ट्रिक साध्यण्यासाठी स्वपक्षीयांबरोबरच मित्रपक्षांच्या उमेदवारांशी झुंज द्यावी लागणार आहे. तर महायुती तुटली नाही तर आमदार भरणे की माजी आमदार हर्षवर्धन पाटलांना तिकीट मिळणार का तसेच शरद पवार गटाकडून कोणास उमेदवारी मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात प्रचंड घडामोडी झाल्या. यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांच्या समर्थकांनी मनापासून जोर लावून नवे जुने कार्यकर्ते एकत्र करून,विधानसभेची तयारी सुरू करण्याचा श्रीगणेशा केला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, तसेच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्यामुळे आमदार भरणे यांना अनोखे बळ राज्य सरकारकडून मिळत असल्याची चर्चा आहे.
मात्र, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधानपरिषेवर संधी न मिळाल्याने ते ही विधानसभा लढविण्याच मनस्थितीत असल्याने इंदापूर विधानसभेचा तिढा कसा सुटणार की या ठिकाणी महायुतीत मिठाचा खडा पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
इंदापूर तालुक्यातील उपेक्षित घटकांचे प्रश्न शासन दरबारी थेट अधिवेशनात मांडून लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाची मरगळ बाजूला सारण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी नागरिकांना राष्ट्रवादीची थोडक्यात पवार कुटुंबात झालेली फोडाफोडी पटलेली नसून त्यांनी उपमुखमंत्री अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत साफ नाकरले आहे.
त्याचाच परिणाम विधानसभेवरही होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असली तरी लोकसभेपेक्षा विधानसभेचा आखाडा नक्कीच वेगळा असतो आणि विधासभेत अजित पवाराच दादा असल्याचे अतापर्यंत सिद्ध झाले आहे. दरम्यान, लोकसभेच्या अनुभवावरून कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू असून निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय उलथापालथ होणार यासाठी वेट अँड वॉचचीच भूमिका बजवावी लागणार आहे.
पवार गटातून कोण?
जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी सुरुवातीला पवारांच्या कार्यक्रमात हजेरी लावून आपण पवार गटात असल्याचे दाखवून दिले होते. तर लोकसभा निवडणुकीत थेट महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचे काम केल्याने त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा रंगली होती.
तर लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी शरद पवार गटात सहभाग घेत सुप्रिया सुळे यांना लिड मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने पवार गटातून माने, जगदाळे, शहा की आणखी कोणता नवीन चेहरा समोर येणार हे आगामी काळात स्पष्ट होईलच.
हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष
माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते यंदा विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांना आमदारच करायचे, असे पक्क गणित मनात धरून बसले आहेत, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांसमोर हा गुंता सोडविणे फार अवघड आहे, तरी हर्षवर्धन पाटलांना साखर संघाचे अध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी थोडीफार दूर केल्याची चर्चा असली तरी हर्षवर्धन पाटील ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणता बॉम्ब फोडणार की पक्षादेश मानून महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.





