अवघड सोपं झालं हो! घरबसल्या ‘Aadhaar’मधील मोबाईल नंबर बदलता येणार, कागदपत्रांची गरज नाही, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली: आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता लवकरच तुम्हाला आधार कार्डमधील नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज पडणार नाही. आधारचे नियमन करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने एक महत्त्वपूर्ण डिजिटल सेवा जाहीर केली आहे, ज्यामुळे नागरिक घरबसल्या आपला मोबाईल नंबर अपडेट करू शकतील.
या नवीन सुविधेनुसार, वापरकर्ते आधार ॲपवर (Aadhaar App) केवळ OTP आणि फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication) वापरून आपला मोबाईल नंबर अपडेट करू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही आणि ज्येष्ठ नागरिकांसह दुर्गम भागातील रहिवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
Coming Soon! Update Mobile number in Aadhaar from the comfort of your home — through OTP & Face Authentication.
No more standing in the queue at the Aadhaar Centre.
Stay tuned…
Download now!
Android: https://t.co/f6QEuG8cs0
iOS: https://t.co/RUuBvLwvsQEarly adopters… pic.twitter.com/ZDjguIc9rZ
— Aadhaar (@UIDAI) November 28, 2025
अशी असेल नवी प्रक्रिया-
-सर्वात आधी युजर्सना UIDAI चे नवीन आधार ॲप डाऊनलोड करावे लागेल.
-ॲपमध्ये आपला आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
-त्यानंतर, OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागेल, जो जुन्या किंवा नवीन उपलब्ध असलेल्या क्रमांकावर पाठवला जाईल.
-पुढील टप्प्यात, स्मार्टफोन कॅमेऱ्याद्वारे फेस ऑथेंटिकेशन करून ओळख पटवावी लागेल.
-₹50 चे शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होईल. बायोमेट्रिक अपडेटसोबत हे शुल्क माफ असेल.
-ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होईल. अपडेटची स्थिती तपासण्यासाठी युजर्सना एक URN क्रमांक दिला जाईल, ज्याच्या मदतीने UIDAI च्या वेबसाइटवर २ ते ४ आठवड्यांत स्टेटस पाहता येईल.
मोबाईल नंबर अपडेट का महत्त्वाचे ?
आधार कार्ड ही देशातील १३० कोटींहून अधिक लोकांची ओळख आहे आणि मोबाईल क्रमांक हा त्याचा कणा आहे. बँक खाते, सरकारी सबसिडी, आयकर पडताळणी आणि डिजीलॉकरसारख्या महत्त्वाच्या डिजिटल सेवांसाठी OTP याच क्रमांकावर येतो. जुना क्रमांक हरवल्यास किंवा बंद झाल्यास नागरिकांना अनेक अडचणी येतात. आतापर्यंत या अपडेटसाठी आधार केंद्रावर जावे लागत होते, जिथे बायोमेट्रिक पडताळणी आणि लांब रांगांचा त्रास होता. UIDAI च्या या डिजिटल पुढाकारामुळे नागरिकांचे श्रम आणि वेळ वाचणार आहे.
UIDAI ने गेल्या महिन्यातच आधारचे नवीन, प्रायव्हसी-फर्स्ट ॲप लॉन्च केले होते, ज्यात एकाच फोनमध्ये ५ लोकांचे आधार ठेवण्याची आणि केवळ आवश्यक माहिती शेअर करण्याची सोय आहे.





