आरशासमोर उभं राहिल्यावर आपण नक्की कोण आहोत असा प्रश्न पडला आहे का? आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठीची धडपड अनुभवली आहे का? आपण कोण आहोत आणि आपल्या आजूबाजूला वावरणारी इतर माणसं आपल्याला त्यांच्यापेक्षा वेगळं का समजत आहेत? आपण खरंच वेगळे आहोत का? वेगळे म्हणजे काय? कोण? आजूबाजूचे इतर लोक आपल्याला त्यांच्यात सामावून का घेत नाहीत? आपण आजारी तर नाही ना? हे प्रश्न कधी पडले आहेत का? बऱ्याच जणांना पडलेही असतील. काहींना त्यांची उत्तरं मिळाली आहेत पण काही जण अजूनही झटत आहेत ती उत्तरं शोधण्यासाठी. काही जणांना उत्तरं सापडली आहेत पण मग आता पुढे काय असा नवीन प्रश्न पडला आहे, तर काही जण या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि पुढचा मार्ग दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे पुण्यात दि.८ फेब्रुवारी रोजी पार पडलेले अद्वैत- इंटरनॅशनल क्वियर( गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स) फिल्म फेस्टिव्हल. यंदाचं या फिल्म फेस्टिवलचं हे पाचवं वर्ष आहे. पुण्यातील बिंदू क्वियर राईट्स फौंडेशन आणि समपथिक ट्रस्ट तसेच हमसफर ट्रस्ट तर्फे या फेस्टिव्हलचं आयोजन प्रभात रोडवरच्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात करण्यात आले होते. यात होल्डिंग द मॅन (ऑस्ट्रेलिया), मेमरीज इन मार्च( भारत) आणि फेअर हेवन ( अमेरिका) हे चित्रपट दाखवण्यात आले. समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथी, इंटरसेक्स समाजाच्या हक्कांसाठी, आरोग्यासाठी लढणाऱ्या चळवळींनी आयोजित केलेल्या या फिल्म फेस्टिव्हलला भरघोस प्रतिसाद मिळाला. तिथे येणारा प्रत्येक जण त्या चित्रपटातल्या पात्रांशी स्वतःला रिलेट करू पाहत होता. आपल्यासारख्या मित्रमैत्रिणीमध्ये मिसळून या चित्रपटाचा आस्वाद घेत होता. चित्रपट जणू आपलीच कथा मांडत आहेत असे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.
समाजाने कायमच या घटकांना आपल्यापासून दूर ठेवलं आहे. त्यांच्याबद्दलचे गैरसमज, अज्ञान यामुळे मुख्य प्रवाहात येण्यापासून यांना अडथळा निर्माण होत आहे. असे फिल्म फेस्टिव्हल्स, कार्यक्रम असतील त्यातून व्यक्त होण्यासाठी एक मार्ग या सगळ्यांना मिळाला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याने समाजातले इतर घटकही याचा लाभ घेऊ शकले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना या समाजाबद्दल गैरसमज दूर होण्यासाठी थोडीशी मदत झाली.
शाळेत आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा म्हटली असेल, “सारे भारतीय माझे बांधव आहेत.” या साऱ्या बांधवांना आपण सामावून घ्यायला हवं. त्यांच्या मूलभूत हक्क मिळवण्याच्या धडपडीत सहभागी व्हायला हवं.
एकूणच काय, आजचा हा फिल्म फेस्टिव्हल समाजमनावर चांगले परिणाम घडवून आणणारा ठरेल, अशी आशा करूया.
– वैष्णवी सविता सुनील
कॉलेज रिपोर्टर,
संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ