आजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा 

नवी दिल्ली – “कोणत्याही आजाराने मरण्याच्या आगोदर आम्ही उपासमारीनेच मरून जाऊ. आमचे अंत्यसंस्कारही करायला इथे कोणीही नाही आहे.’ अशा शब्दात प्रवासी कामगारांनी आपल्या व्यथा व्यक्‍त केल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील कनौज जिल्ह्यातल्या आपल्या गावी परत जायला निघालेल्या अन्य कामगारांच्या जथ्थ्यातील सावित्री नावाच्या कामगार महिलेने आपली व्यथा बोलून दाखवली. सावित्री ही प्रवासी कामगारांच्या गटातील एक महिला आहे. दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात ती आपल्या सहकारी नातेवाईकांबरोबर मोलमजुरी करून रहाते आहे. मात्र उपासमार व्हायला लागल्याने त्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

“कोणत्यातरी व्हायरसबद्दल लोक बोलत असतात. त्यामुळे आम्ही मरू असे ते म्हणतात. मात्र त्यापूर्वी उपासमारीमुळेच आम्ही मरून जाऊ. आई म्हणून माझे दु: ख होते. कारण मी माझ्या मुलांना खाऊ घालू शकत नाही.’ असे सावित्री रस्त्याने चालता चालता म्हणाली.

लॉकडाऊनच्या स्थितीमुळे रोजगार आणि प्रवासाची वाहनेही उपलब्ध नसल्यामुळे या कामगारांना पायी आपल्या गावी परत जाण्यावाचून गत्यंतर राहिलेले नाही. देशाच्या विविध भागांमधून अशा प्रवासी कामगारांचे गट महामार्गांनी आपापल्या गावी चालत परत जायला निघाल्याचे दृश्‍य गेल्या काही दिवसांपासून दिसते आहे. राजस्थान, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांमधील प्रवासी कामगार आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. अशा निम्म्या रस्त्यावर आलेल्या कामगारांसाठी दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारने बसची व्यवस्था केली आहे. मात्र तरिही अनेकांनी चालण्याचा पर्याय निवडला आहे. व्यवस्था केलेल्या बसच्या टपांवर बसूनही अनेकजण प्रवास करत आहेत.

लॉकडाऊनमुळे आजाराची भीती वाटेनाशी झाली आहे. आता उपासमारीमुळे मरायचीच भीती वाटत असल्याची भावना बहुतेकांनी व्यक्‍त केली आहे. हात न धुणे, एकमेकांपासून दूर न थांबणे आणि मास्क न वापरणे यामुळे संसर्ग होऊ शकेल, असे त्यांना काहीच वाटत नाही. चालत आपल्या घरी कधी पोहोचू याचा कोणालाच काही अंदाज नाही. पाठीवर घेतलेल्या ओझ्यामध्ये प्रवासात पुरेल तेवढा शिधा बरोबर घेतला आहे. मात्र तो संपल्यावर पुढे काय, हे कोणालाही सांगता येत नाही. मात्र आपण घरापर्यंत नक्की पोहोचू, अशी खात्री या कामगारांना वाटते आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.