‘दीदी पुरस्कार’ संजीवनी भेलांडे यांना जाहीर; पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची माहिती

पुणे – मा. दीनानाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांना यंदाचा दीदी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लता मंगेशकर यांच्या ९५ व्या जन्मदिनानिमित्त म्हणजे २८ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या “ते श्री शारदा विश्वमोहिनी लतादीदी’ कार्यक्रमात तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते भेलांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी शुक्रवारी दिली.
कार्यक्रमाच्या पहिल्या भागात संजीवनी भेलांडे यांच्यासह अजित परब, मनीषा निश्चल आणि डाॅ. उन्मेष करमरकर काही गीते सादर करणार आहेत. दुसऱ्या भागात पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, तिसऱ्या भागात पं. हृदयनाथ मंगेशकर हे आठवणी सांगणार आहेत. त्याला अनुसरून विभावरी आपटे-जोशी दीदींची गीते सादर करणार आहेत. सतीश पाकणीकर यांनी टिपलेली दीदींची छायाचित्रे या वेळी पाहता येतील.
“लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ६ फेब्रुवारी रोजी पुण्यात लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये एका मान्यवराला दीदीच्या नावाने तीन लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ. धनंजय केळकर आणि त्यांचे सहकारी या कार्यक्रमाचे नियोजन करणार आहेत. तसेच एप्रिलमध्ये देण्यात येणाऱ्या लता मंगेशकर पुरस्काराची रक्कम पाच लाखांवरून दहा लाख करण्यात येणार आहे.” – पं. हृदयनाथ मंगेशकर, अध्यक्ष, लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन.





