महापालिका प्रशासनाचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना पत्र पुणे – शहरात रस्त्यावर उभारण्यात येणारे मेट्रोचे खांब तसेच स्थानक परिसरात प्रवाशांच्या एन्ट्री आणि एक्झिटसाठी महामेट्रोने काम सुरू केले आहे. यासाठी महामेट्रोने महापालिकेची परवानगी घेतली का, त्यासाठी कोणत्या तरतुदीनुसार काम करण्यात आले, याची माहिती महापालिका प्रशासनाने महामेट्रोकडून मागवली आहे. शहरातील रस्त्यांवर मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात येणाऱ्या 628 खांबांच्या जागांचे तब्बल 27 कोटींचे शुल्क महापालिकेने महामेट्रोकडे मागितले होते. ते देण्यास महामेट्रोने नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने हे पत्र पाठवत महामेट्रोला कोंडीत पकडले आहे. मेट्रो प्रकल्पाची मार्गिका वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गावरून आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गात 588 खांब रस्त्यावर, तर नदीपात्रात 59 खांब आहेत. याशिवाय पिंपरी ते स्वारगेट या उन्नत मार्गामधील पुणे हद्दीत बोपोडी ते कृषी महाविद्यालय मार्गावर एकूण 40 खांब आहेत. यासाठी महामेट्रोकडून वापरण्यात येणाऱ्या जागांचे शुल्क पालिकेने महामेट्रोकडे पत्राद्वारे मागितले होते. ते देण्यास महामेट्रोने साफ नकार दिला आहे. तसेच मेट्रो खांबासाठी वापरत असलेली जागा ही दुभाजकांची असून त्याचा व्यावसायिक वापर करत नसल्याचे सांगत महापालिकेची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने आता खांबाच्या जागासह फुटपाथच्या जागा मेट्रो स्टेशनच्या एंट्री-एक्सिट, जिना अशा वापरल्या आहेत, त्याला परवानगी घेतली का असे विचारले आहे. पालिकेने मेट्रोला फक्त बालगंधर्व रंगमंदिराची जागा दिली असून उर्वरित जागा दिलेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्या तरतुदीनुसार, या जागा वापरल्या तसेच त्याला महापालिकेची मान्यता घेतली का आणि महापालिकेने मागितलेली 27 कोटींच्या खांबाच्या जागेचे शुल्क योग्य का नाही, याचा खुलासा महामेट्रोकडून मागवण्यात आला आहे.