Baramati News : अजित पवारांच्या निधानामुळे मतदारांनी मतदानाकडे फिरवली पाठ? बारामतीत ‘इतके’ टक्के झाले मतदान
Baramati News : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीकरांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे.

Baramati News : ७ फेब्रुवारीला राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीसाठी मतदान पार पडले. विविध ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड, काही ठिकाणी गोंधळ या घटना वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पुणे जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे.
मात्र, पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यात मतदारांमध्ये निरुत्साह बघायला मिळाला. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत बारामतीमधील मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान बारामती तालुक्यात झाले आहे. अवघे ५४ टक्के मतदान झाले आहे. ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतच अजित पवार यांना काळाने हिरावून घेतले. परिणामी बारामती तालुक्यावर दुःखाचे सावट होते. यामुळे मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरल्याची चर्चा आहे.
बारामती येथील मतदान केंद्रावर पवार कुटुंबातील सदस्यांनी आवर्जून मतदान केले. मात्र, सामान्य मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसते. पुणे जिल्ह्यात वेल्हेमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. सरासरी ७९ टक्के मतदान करण्यात आल्याची नोंद आहे. तर पुणे जिल्ह्यात ७९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
वाचा कुठे किती टक्के मतदान झाले
आंबेगाव: ६५.३० टक्के
शिरूर: ७५.६९ टक्के
खेड: ७५.४६ टक्के
मावळ: ७७.४३ टक्के
मुळशी: ६३.७९ टक्के
हवेली: ६८.०२ टक्के
दौंड: ६५ टक्के
पुरंदर: ६८.३७ टक्के
वेल्हे: ७९.३० टक्के
भोर: ७५.६२ टक्के
बारामती: ५४.९० टक्के
इंदापूर: ६५.६७ टक्के
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मानले आभार
या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदारांचे आभार मानत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानले आहेत.





