Rupali Thombare-Patil : संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आला होता कि आग लावायला?; रूपाली ठोंबरे- पाटील यांचा आव्हाडांना सवाल

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते.
जितेंद्र आव्हाड यांची मंत्री धनंजय मुंडेंवर टीका
या मोर्चामधून जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार टीका केली. बीडच्या राजकारणाला कधी जातीचा स्पर्श झाला नाही. बीडचा सत्यानाश पोलिस प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांने केला आहे. वाल्मिक कराडचा वाल्या झाला आहे. बीडमध्ये अनेक वंजारी समाजाच्या अनेकांच्या हत्या झाल्या आहेत. बीडमध्ये एकही अधिकारी धनंजय मुंडेंना विचारल्याशिवाय आणला जात नाही. ॲट्रॉसिटी दाखल केली असती तर आज संतोषची हत्या झाली नसती असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मी हमालाचा नातू आहे. माझ्या बहिणीचं कुंकू पुसलय लढताना जातीचा विचार करायचा नाही. तसेच संतोष देशमुखला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली. यादरम्यान राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे- पाटील यांनी एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत तुम्ही संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आला होता कि आग लावायला? असा सवाल जितेंद्र आव्हाडांना केला आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड.
उत्तर दया जितेंद्र भाऊ@Awhadspeaks
माहितीसाठी –@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @DGPMaharashtra pic.twitter.com/3ANGzS6lI1— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 28, 2024
काय आहे स्क्रीनशॉर्टमध्ये?
या स्क्रीन शॉट मध्ये जितेंद्र आव्हाड आणि त्यांचाच एक बीड मधील कार्यकर्ता त्याचं नाव शिवराज आहे यांच्यातील संवाद आहे. रूपाली ठोंबरे- पाटील यांनी हा स्क्रीन शॉट X वर शेअर करत तुम्ही संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आला होता कि आग लावायला? असा सवाल जितेंद्र आव्हाडांना केला आहे. जितेंद्र आव्हाड या सगळ्यांवर काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नेमके काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण?
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.
देशमुख प्रकरणातील तिन्ही गुन्हे सीआयडीकडे
केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तिन्ही गुन्हे आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडीकडे) वर्ग करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.





