Janhavi Killekar: ‘बिस्लेरीने अंघोळ का?’ ट्रोलिंगनंतर जान्हवी किल्लेकरचा संताप; दाखवले चेहऱ्याचे जुने फोटो
Janhavi Killekar जान्हवीने व्हिडीओमध्ये सांगितले की, सोशल मीडियावर केवळ काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून तिच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. तिच्या मते, या विषयाचा पूर्ण संदर्भ समजून घेण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट पाहणे गरजेचे आहे.

Janhavi Killekar: ‘बिग बॉस मराठी 5’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कोल्हापूरला गेल्यानंतर त्वचेच्या समस्येमुळे बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ करत असल्याचे वक्तव्य जान्हवीने एका पॉडकास्टमध्ये केले होते. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका आणि ट्रोलिंग झाली.
आता जान्हवीने सोशल मीडियावर दोन भागांचा व्हिडीओ शेअर करत या ट्रोलिंगला उत्तर दिले आहे. यासोबतच तिने तिच्या त्वचेच्या समस्येबाबत काही जुने फोटोही दाखवले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स दिसत आहेत.
‘पूर्ण पॉडकास्ट पाहा’, जान्हवीचे ट्रोलर्सना उत्तर
जान्हवीने व्हिडीओमध्ये सांगितले की, सोशल मीडियावर केवळ काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून तिच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. तिच्या मते, या विषयाचा पूर्ण संदर्भ समजून घेण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट पाहणे गरजेचे आहे.
तिने म्हटले की, तिला हा व्हिडीओ बनवायचा नव्हता. मात्र तिच्या नावाने अनेक व्हिडीओ तयार करून व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवले जात असल्याचे तिला वाटते. त्यामुळे आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी तिने हा व्हिडीओ पोस्ट केल्याचे सांगितले.
‘मला पाण्यामुळे त्वचेचा त्रास झाला’
आपल्या त्वचेच्या समस्येबद्दल बोलताना जान्हवीने 2020 मधील अनुभव सांगितला. त्यावेळी एका मालिकेच्या शूटिंगसाठी ती पुण्याबाहेर राहत होती. सुरुवातीला तिच्या चेहऱ्यावर कोणताही त्रास झाला नाही. मात्र काही काळानंतर तिच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स येऊ लागले.
त्यानंतर तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी तिला पाण्यामुळे त्वचेवर परिणाम होत असण्याची शक्यता सांगितल्याचे जान्हवीने म्हटले आहे. बाहेरच्या ठिकाणी गेल्यानंतर काही लोकांना पाणी किंवा वातावरणामुळे त्वचेच्या समस्या जाणवू शकतात, असेही तिने सांगितले.
View this post on Instagram
मालिकेच्या शूटिंगदरम्यान वाढली समस्या
जान्हवीच्या म्हणण्यानुसार, मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स इतके वाढले होते की मेकअपच्या माध्यमातून ते लपवावे लागत होते. या समस्येमुळे तिला काही काळासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
त्वचा सुधारण्यासाठी तिने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्याचा दावाही तिने केला. अभिनेत्री म्हणून स्क्रीनवर दिसताना त्वचेची काळजी घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे तिने सांगितले. यासाठी आर्थिकदृष्ट्या अडचणी असतानाही लाखो रुपये खर्च केल्याचे जान्हवीने म्हटले आहे.
‘बिस्लेरीची बाटली 70-80 रुपयांचीच’
बिस्लेरीच्या पाण्यावरून झालेल्या ट्रोलिंगबाबत बोलताना जान्हवीने सांगितले की, एका पाण्याच्या बाटलीवरून एवढा मोठा मुद्दा तयार करण्यात आला. तिच्या म्हणण्यानुसार, ती बाटली साधारण 70 ते 80 रुपयांची असते.
तिने कोल्हापूरच्या पाण्याबाबतही स्पष्टीकरण दिले. कोल्हापूरचे पाणी खराब आहे, असे आपले म्हणणे नव्हते, असे तिने स्पष्ट केले. ‘कोल्हापूरचं पाणी चांगलंच आहे, आपली स्किन वाईट आहे,’ असे म्हणत तिने आपल्या वक्तव्याचा संदर्भ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
‘मी फक्त एक किस्सा सांगितला’
जान्हवीने सांगितले की, ती केवळ आपल्या आयुष्यातील एक अनुभव सांगत होती. मात्र सोशल मीडियावर त्याचा वेगळा अर्थ काढला गेला. आपल्या वक्तव्यामुळे झालेल्या वादानंतर तिने ट्रोल करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.
कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा लाभला आहे, असा उल्लेख करत तिने महिलांचा अपमान करू नये, असेही म्हटले. सध्या जान्हवीचा हा स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.





