Kareena Kapoor: दिवाळी लूक पडला महागात? करीना कपूरला कायदेशीर नोटीस; फोटो हटवण्याची मागणी
Kareena Kapoor मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर खानने दिवाळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने एक खास ऐतिहासिक पेंडंट परिधान केलेले दिसत आहे. हे पेंडंट भोपाळ संस्थानातील बेगमांच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे.

Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या दिवाळीच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तिच्या फॅशनची नाही, तर तिने परिधान केलेल्या एका खास पेंडंटची चर्चा रंगली आहे. या पेंडंटवर कुराणातील पवित्र आयत कोरलेली असल्याचा दावा करण्यात येत आहे. याच कारणामुळे करीना कपूर आणि तिची स्टायलिस्ट रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरून संबंधित फोटो हटवावेत आणि सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नेमका काय आहे वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर खानने दिवाळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने एक खास ऐतिहासिक पेंडंट परिधान केलेले दिसत आहे. हे पेंडंट भोपाळ संस्थानातील बेगमांच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे.
भोपाळमधील काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हफीज यांनी या पेंडंटवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, या पेंडंटवर कुराणातील ‘आयतुल कुर्सी’ ही पवित्र आयत कोरलेली आहे. त्यामुळे धार्मिक महत्त्व असलेल्या या वस्तूचा केवळ फॅशन म्हणून वापर करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पेंडंटच्या वापरावर अब्बास हफीज यांची हरकत
अब्बास हफीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्लिम धर्मात कुराणातील आयतांना अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक धार्मिक मान्यतांनुसार, कुराणातील आयतींना स्पर्श करण्यापूर्वी वजू म्हणजेच धार्मिक शुद्धता पाळली जाते. अशा परिस्थितीत पवित्र आयत कोरलेल्या पेंडंटचा फॅशनसाठी वापर करणे आणि ते विशिष्ट प्रकारच्या पोशाखासोबत परिधान करणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मात्र, भोपाळच्या नवाबांशी संबंधित कलगी किंवा इतर ऐतिहासिक वस्तू परिधान करण्यास आपली कोणतीही हरकत नसल्याचेही हफीज यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा आक्षेप केवळ कुराणातील पवित्र आयत असलेल्या पेंडंटच्या वापराबाबत असल्याचे त्यांनी सांगितले.
View this post on Instagram
करीना आणि रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस
या प्रकरणी अब्बास हफीज यांनी अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिची स्टायलिस्ट रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये करीना कपूरने तिच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवरून संबंधित फोटो तातडीने हटवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाबाबत सार्वजनिकरित्या माफी मागावी, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हफीज यांच्या वकिलांनीही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांचे वकील मोहम्मद जफर यांच्या म्हणण्यानुसार, या कृतीमुळे मुस्लिम समाजातील काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशारा
या नोटीसमध्ये करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. करीना कपूरने संबंधित फोटो हटवले नाहीत किंवा सार्वजनिक माफी मागितली नाही, तर पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाईल अथवा सक्षम न्यायालयात दाद मागितली जाईल, असे वकिलांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप करीना कपूर खान किंवा रिया कपूर यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्याची माहिती नाही. त्यामुळे अभिनेत्री यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे दिवाळीच्या फोटोंमधील करीना कपूरच्या लूकची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे आता याच फोटोंमुळे धार्मिक भावना आणि ऐतिहासिक वारशाशी संबंधित वाद निर्माण झाला आहे. मात्र, पेंडंटचा नेमका इतिहास, त्यावरील आयतीबाबतचे दावे आणि नोटीसमधील आक्षेप यावर पुढे काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





