बारामती -सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालायासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने पूर्ण वेळ कंत्राटी स्वरूपाचा डायलेसिस ऑपरेटर जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येथे डायलेसिस सेवा सुरू झाली आहे. आज पहिल्या रुग्णाने या सेवेचा लाभ घेतला. ज्येष्ठ नागरिक, बीपीएल रेशनकार्ड धारकांसाठीही सेवरमोफत असून इतर रुग्णांसाठी केवळ दोनशे रुपयांतही सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली.
मुंबईच्या सिध्दीविनायक ट्रस्टच्यावतीने राज्य सरकारला 34 डायलेसिस मशीन देण्यात आल्या आहेत. या मशिन राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन डायलेसिस मशीन देण्यात आल्या होत्या. मात्र, या मशिनच्या वापरासाठी आवश्यक असणारे डायलेसिस ऑपरेटर हे तांत्रिकपद सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सुरू झाली नव्हती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नी लक्ष घालून सूचना केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांनी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयासाठी पूर्ण वेळ कंत्राटी स्वरुपाचे डायलेसिस ऑपरेटर उपलब्ध करून दिला आहे. तसेच बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी मेडिसीन तज्ज्ञ डॉक्टरांची सेवेसाठी मदत घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वात पहिल्यांदा बारामती शासकीय रुग्णालयातही सेवा सुरू
झाली आहे.
जनजागृती करणार
सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात असणाऱ्या दोन मशिनवर दिवसभरात चार रुग्णांना डायलेसिस सेवा देता येणार आहे. बारामती तालुक्यातील गरजू रुग्णांना याचा लाभ घेता यावा. यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा वर्कर, खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.