पुणे | राज्यभरात धुव्वाधार, पुण्यातही मुसळधार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यात पावसाचा जोर वाढल्याने कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. गेल्या २४ तासात कोकणातील पेडणे येथे सर्वाधिक १८० मिमी पावसाची नोंद झाली.
तर पुढील २४ तासांसाठी काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात काही भागात ढगफुटीसदृश्य, तर काही भागांत मुसळधार पाऊस झाला.
नैऋत्य मोसमी पावसाच्या माघारीची रेषा आज कायम आहे. तर उत्तर कोकण ते दक्षिण बांगलादेश एक कमी दाबाचे द्रोणीय क्षेत्र दक्षिण छत्तीसगडवरून जात आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे.
कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक दठकाणी खूप जोरदार पाऊस झाला. त्यामध्ये पेडणेसह सावंतवाडी, पालघर, मालवण, देवगड, पणजी आणि म्हापसा याठिकाणी १२० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे सर्वाधिक ११० मिमी पावसाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्रातील अकोले येथे ७०, इगतपुरी आणि भडगावला ६० मिमी या प्रमाणे पावसाची नोंद झाली.
मुसळधार पावसाची शक्यता कायम
राज्यातील कोकण गोवा आणि मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
या विभागातील रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग यासाठी रेड अलर्ट तर पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा, जालना, बीड, नंदुरबार, धुळे, संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होईल.
गेल्या २४ तासांत राज्यातील पाऊस (मिमीमध्ये)
पेडणे १८०, सावंतवाडी १६०, पालघर १५०, मालवण आणि देवगड १४०, पणजी १३०, म्हापसा १२०, वाशी ११०, सांगे १००, माथेरान आणि रत्नागिरी ९०, अकोले ७०, भडगाव, इगतपुरी, अहमदपूर आणि लोहगाव ६०, माढा, फुलंब्री आणि लातूर ५०, चास आणि लाखांदूर ४०, संगमनेर आणि सेलू ३०, परभणी आणि साकोली २०.

