Dhurandhar Advance Booking : गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट ५ डिसेंबर या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे रणवीर सिंह पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जोरदार कमबॅक करणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. अशातच आता धुरंधर चित्रपटाच्या अॅडव्हाॅन्स बुकिंगबाबत माहिती समोर आली आहे. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांद्वारे रणवीरने आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडले. धुरंधर चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘धुरंधर’ने ब्लॉक सीट्ससह अॅडव्हान्स बुकिंगमधून आधीच 3.67 कोटींची कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, 44,987 तिकिटे विकली गेली आहेत. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून दोन दिवस बाकी असल्याने यामध्ये आणखी वाढ होणार आहे. धुरंधर चित्रपटात अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणार असून, चित्रपटातील काही दृश्यांमुळे वाद निर्माण होण्याची चर्चा आहे. अभिनेता रणवीर सिंह त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटानंतर धुरंधर या मोठ्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटातील त्याचा लूक यावर सर्वात जास्त चर्चा होत असून तो प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अदित्य धर यांनी केले आहे. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रणवीर सिंहचा धुरंधर काय कमाल करू शकेल हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. हेही वाचा : प्रभासच्या ‘स्पिरीट’ चित्रपटात हुमा कुरेशीची एन्ट्री!