बारामती शहरात आज धुमशान ; सांगता सभेत शरद पवार ,अजित पवारांच्या तोफा धडाडणार

बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघातील वातावरण प्रचाराने ढवळून निघाले असून सोमवार (दि.१८) होणाऱ्या सांगता सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्याही तोफा सांगता सभेचे निमित्ताने बारामतीत धडाडणार आहेत. कोण काय बोलणार, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून दोन्ही नेत्यांच्या शेवटच्या सभा बारामतीत होणार आहेत. शरद पवार यांची लेंडी पट्टा जुना मोरगाव रोड येथे भव्य सभा होणार महाविकास आघाडीचे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर प्रचाराची सांगता होईल.
मात्र, शरद पवार अजित पवार यांच्या विरोधात कोणती तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजी पलटविण्यात शरद पवार माहीर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आज ते काय भूमिका घेणार याची उत्सुकता बारामतीकरांना लागली आहे. अजित पवार देखील विधानसभेच्या निवडणुकीत तयारीने उतरले आहेत. यापूर्वी सलग सात वेळा त्यांनी बारामती मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.
प्रचाराचा धुरळा आज थंडावणार
विकासाच्या जोरावर अजित पवार बारामतीत आत्मविश्वासाने उभे आहेत. अजित पवार यांनी वेळोवेळी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तरी शहरातील मिशन ग्राउंडवर होणाऱ्या सांगता सभेत ते काय बोलणार याकडे देखील बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच प्रचाराचा धुरळा मोठ्या प्रमाणात उडाला असून संपूर्ण पवार कुटुंबीय प्रचाराच्या मैदानात उतरले आहे. एकमेकांवर टीकेची झोड उठवत त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे. मतदार कोणाच्या पडद्यात बारामतीचे आमदारकी टाकणार हे दि. २३ तारखेच्या निकालात स्पष्ट होईल.





