धुराडी बंदच मात्र निवडणुकांचा “धुरळा’ उडणार !

समीरण बा. नागवडे
बॅंक निवडणूक लांबल्याने साखर कारखान्यांच्या निवडणुका “लक्ष्य’
श्रीगोंदा – या हंगामात तालुक्यातील चारही कारखान्यांची ‘धुराडी’ अपुऱ्या उसामुळे बंद राहिली, परंतु आता दोन्ही सहकारी कारखान्यांच्या निवडणुकीचा ‘धुरळा’ उडणार आहे. जिल्हा बॅंकेची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी कारखान्यांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. जिल्हा बॅंकेसह नागवडे व जगताप या दोन्ही सहकारी कारखान्यांच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने सहकारी संस्थांचे बहुतांश सभासद मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे राज्य शासनाने जिल्हा बॅंकांसह सेवा संस्था आणि पतसंस्थेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बॅंकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने तालुक्यात बॅंकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या ठरावांच्या राजकारणाला ‘ब्रेक’ लागला आहे. नेतेमंडळींनी आपला मोर्चा नागवडे व जगताप कारखान्यांच्या निवडणुकांकडे वळवला आहे.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजप प्रवेश करून आमदार बबनराव पाचपुते यांचा प्रचार केल्याने नागवडेंना आता कारखाना निवडणुकीत अडचण येणार नाही, असे आडाखे बांधले जात होते. परंतु, अध्यक्ष नागवडे यांच्या कारभाराविषयी जाहीर नाराजी व्यक्त करीत कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी नागवडे विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे आणि बाळासाहेब नाहाटा यांना ‘मॅनेज’ करण्यात नागवडेंना यश आले असले तरी मगर यांच्यासह राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, भाजपचे अण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे आदींनी नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत मंडळ उभारण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यातच, निम्म्यापेक्षा अधिक सभासदांना मतदानाचा अधिकार न मिळाल्याने चांगलेच राजकारण तापले आहे.
जगताप कारखान्याच्या मागील निवडणुकीत मंडळ उतरवलेले घनश्याम शेलार यावेळी जगताप यांच्याबरोबर गेल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा होती. परंतु, जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी कारखाना निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्याचबरोबर जगताप यांचे पारंपरिक विरोधक दिनकर पंधरकर यांनी देखील कारखाना निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. नागवडे’ प्रमाणेच जगताप कारखान्याने देखील निम्या सभासदांना अक्रियाशील ठरवले असल्याने तोच मुद्दा उचलून धरला जात आहे. आमदार बबनराव पाचपुते यांनी दोन्ही सहकारी कारखान्यांच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही, अशावेळी पाचपुतेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूणच, जिल्हा बॅंकेची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी दोन्ही कारखान्यांची निवडणूक एप्रिलमध्ये होऊ घातल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून उसंत मिळाल्याने दुसऱ्या फळीतील नेतेमंडळीनी कारखान्याच्या निवडणुकांना ‘लक्ष्य’ केले आहे.





