चेन्नई -चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आयपीएल स्पर्धेतून यंदाच्या मोसमानंतर निवृत्त होण्याबाबतचे वृत्त फेटाळले आहे. संपूर्ण स्पर्धा खेळणार आहे, त्यापूर्वी सध्यातरी असा कोणताही विचार नाही व तसेच संकेतही देणार नाही अन्यथा प्रशिक्षक व सहकारी खेळाडूंवर विनाकारण दडपण येईल, अशा शब्दात धोनीने हा प्रश्न टोलावला आहे.
चेन्नई संघाच्या एका कार्यक्रमात धोनीने विविध विषयांवर मनमोकळेपणाने उत्तरे दिली. मात्र, आपल्या निवृत्तीच्या चर्चांना काहीही अर्थ नसल्याचे सांगितले. यंदाची स्पर्धा सुरु आहे. माझ्या पायाची दुखापतही आता ठीक आहे. या स्पर्धेतील आणखी बरेच सामने होणे बाकी आहे. सध्यातरी मी या सामन्यांबाबत लक्ष केंद्रित करत आहे. निवृतीचा विचारही माझ्या मनात नाही.
मी आता याबाबत काहीही बोललो तर प्रशिक्षकांवर दबाव येईल व मला त्यांच्यावर कोणताही दबाव टाकायचा नाही. निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी अजून बराच काळ बाकी आहे, असेही धोनी म्हणाला. 41 वर्षे वय झाले असले तरीही यंदाच्या स्पर्धेत धोनी चांगलाच भरात आहे. यंदाच्याच मोसमात त्याने चेन्नईचा कर्णधार म्हणून 200 वा सामना खेळला.
धोनीनेच दिले होते संकेत
यंदाच्या मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वीच धोनीने आपल्या आयपीएलमधील निवृत्तीचे संकेत दिले होते. कदाचित यंदाच्या मोसमात मी माझा अखेरचा सामना खेळेन असे धोनी म्हणाला होता. मात्र, त्यानेच आता हा नवा खुलासा केल्याने या चर्चांना त्यानेच पूर्णविराम दिल्याचे दिसत आहे. गेल्या मोसमात त्याने रवींद्र जडेजाकडे नेतृत्व सोपवले होते. मात्र, संघाची कामगिरी खालावल्यामुळे त्याने पुन्हा एकदा नेतृत्व आपल्या हातात घेतले होते. त्यामुळे पुढील दोन ते तीन मोसम तरी धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार नाही असेच चित्र दिसत आहे.