चाळीशीच्या धोनीचे पुनरागमन अशक्य

मुंबई – आयपीएलमध्ये सरस कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालेल्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमन अशक्य असल्याचे संकेत बीसीसीआयकडूनच मिळत आहेत.
याच महिन्यात धोनीचा 39 वा वाढदिवस झाला, आयपीएल स्पर्धा जरी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत होणार असली तरीही त्यातील कामगिरीनंतरही धोनीला भारतीय संघात पुनरागमनाची संधी निवड समिती देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण पुढील वर्षी होत असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत चाळीशीच्या धोनीला खेळविण्याची मानसिकता समिती दाखवेल का, हा मुद्दा आहे. जरी आयपीएलपूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला तरीही त्यात धोनीला संधी देण्यापेक्षा पुढील वर्षी होत असलेल्या महत्त्वाच्या स्पर्धा लक्षात घेता समिती नवोदितांनाच संधी देण्याची शक्यता जास्त आहे.
पुढील वर्षी धोनी वयाची चाळीशी पार करत आहे. भारतीय संघाकडे लोकेश राहुलचा बदली यष्टीरक्षकाचा पर्याय खुला असून त्यामुळे एक फलंदाज जास्त खेळवता येणार आहे. त्यामुळे धोनीच्या पुनरागमनाचा मार्ग खडतर बनला आहे.





