Dhom Dam – धोम धरणाचा डावा कालवा असणाऱ्या शेंदुरजणे, पांडे, अनवडी, भिरडाचीवाडी, देगाव, किकली,काळंगवाडी या गावांमधून गेलेल्या कालव्यांची अवस्था दयनीय झाली असून धोम पाटबंधारे विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने कालव्यांची अवस्था ठिकठिकाणी भगदाड पडल्याने फुटण्याच्या मार्गावर आहे. धोम धरणाचे काम 1968-77 या कालावधीत झाले. शेतीच्या पाण्यासाठी डावा व उजवा असे दोन कालवे बांधण्यात आले. डावा कालवा 113 किमी लांबीचा पाणीवहन नेण्याची क्षमता 21.20 घनमीटर आहे. या कालव्यामुळे 38 हजार 439 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येते. उजव्या कालव्याची लांबी 58 किमी व पाणी वाहन क्षमता 5.81 असून दहा हजार 460 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. या धरणाचे पाणी सातारा, कोरेगाव ते सांगलीपर्यंत बळीराजा आपल्या शेतीला देत असतो. धरण झाल्यावर 40-45 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन्ही कालव्यांची आज तागायत डागडुजी झाल्याचे दाखवून देतात. धोम पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे दोन्ही कालव्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे. धरणातील पाणी कालव्यात सोडल्यावर हजारो कयुसेक्स पाणी ओढ्या नाल्यामधून वाया जात असते. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वेगाने कमी होऊन शेतकऱ्यांचे व पर्यायाने शासनाचे मोठे नुकसान होत आहे. कालव्या वरील पुलांची ही दुरावस्था झाली आहे. बहुतांश पूल पडण्याच्या अवस्थेच्या मार्गावर आहेत. त्या त्या भागातील शेतकरी या पुलांचा वापर करतात. हे पूल पडल्यास शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणार आहे. पाच तालुक्यांची तहान भागवणारे धोम धरण आणि त्यावरील कालवा व्यवस्थापन सध्या पूर्णपणे रामभरोसे झाले आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भगदाड पडल्याने पाणी वाया जाण्याचे प्रमाण वाढले आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व नियंत्रण करण्यात पाटबंधारे प्रशासन अपयशी ठरत असून विशेषतः पाट कऱ्यां कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. वाया जाणारे पाणी रोखणार तरी कसे ? एकीकडे शेतकरी पाण्यासाठी वणवण भटकत असताना दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर पाटकरी व संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. खिसे गरम करण्याच्या नादात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. धोम पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात वारंवार कालवा फुटीचे प्रकार घडत असताना वाया जाणारे पाणी रोखणार तरी कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.