दै. “प्रभात’ने सोमवारच्या अंकात पहिल्या पानावर नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्याविरोधातील अविश्वास ठराव बारगळण्याची शक्यता व्यक्त केली होती. नेमके त्याचप्रमाणे ठरावाच्या वेळी घडून आल्याने अनेकांनी दै. “प्रभात’च्या अंदाजाचे कौतुक केलं.
लोणंद – लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात सोमवारी झालेल्या नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाच्या बैठकीला ऐनवेळी नाट्यमय वळण मिळाले. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि भाजपचे तेरा सदस्य बैठकीसाठी एकत्रितपणे नगरपंचायतीत दाखल झाले. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या योगेश क्षीरसागर यांनी “यू टर्न’ घेत ठरावाच्या विरोधात मतदान करीत अनपेक्षित धक्का दिला.
प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अविश्वास ठरावावर सह्या केलेल्या तेरांपैकी नगरसेवक हणमंतराव शेळके-पाटील, विकास केदारी, शैलजा खरात, हेमलता कर्नवर, राजेंद्र डोईफोडे, कृष्णाबाई रासकर, किरण पवार, स्वाती भंडलकर, ऍड. पुरुषोत्तम हिंगमिरे, लक्ष्मणराव शेळके- पाटील, लीलाबाई जाधव, दीपाली क्षीरसागर अशा बारा नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले तर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी ठरावास सहमती दर्शवली नाही.
त्यामुळे आवश्यक मतदान न झाल्याने हा ठराव बारगळल्याचे स्पष्ट झाले. यावेळी नगरपंचायत सभागृहात खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, तसेच लोणंदचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले उपस्थित होते. ठरावास नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्यासह माजी नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके पाटील, कुसुम शिरतोडे व मेघा शेळके असे चार नगरसेवक अनुपस्थित राहिले होते.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. हा अविश्वास ठराव बारगळला असल्याने नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील आपला कार्यकाल यापुढे विनासायास पूर्ण करणार हे स्पष्ट झाले आहे. याबाबत नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अडचणीत मित्रच मदतीला धावून आल्याचे सांगितले. तसेच याविषयावर कोणावरही टीका करण्याचे टाळून लोणंदच्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले.